‘मुन्नाभाई एमबीबीएस’मध्ये डॉ. अस्थाना आणि ‘थ्री इडियट्स’मध्ये व्हायरससारख्या संस्मरणीय भूमिका साकारणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे बोमन इराणी (Boman Irani). बोमन इराणींनी त्यांच्या आयुष्यात खूप मोठा संघर्ष केला आहे. एकेकाळी वेटरचं काम करणाऱ्या बोमन इराणींनी मेहनत करत मुंबईत स्वत:चं आलिशान घर घेतलं. पण, तुम्हाला माहीत आहे का? बोमन इराणींना त्यांचं आलिशान घर खरेदी करण्यासाठी अनिल कपूरने प्रोत्साहित केलं होतं. याबद्दल स्वत: बोमन इराणींनी सांगितलं आहे.
मुंबई सेंट्रलमधील पिकोला येथे ४६ वर्षे राहिल्यानंतर बोमन इराणी आणि त्यांचे कुटुंब नवीन ठिकाणाच्या शोधात असताना एका परिसरात नवीन घर पाहण्यासाठी गेले, तिथे त्यांना तीन खोल्यांचं प्रशस्त घर दाखवण्यात आलं. पण, तेव्हा बोमन इराणींना ते घर परवडण्यासारखं नव्हतं, कारण तेव्हा त्यांनी त्यांच्या करिअरला नुकतीच सुरुवात केली होती, त्यामुळे ईएमआयवर घर घेणं परवडू शकतं का, याबद्दल विचार ते करत होते. याच काळात त्यांना अनिल कपूरने ते घर खरेदी करण्यासाठी प्रोत्साहित केलं.
एशिअन पेंट्सशी साधलेल्या एका जुन्या संवादात बोमन इराणींनी याबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी असं म्हटलं की, “मी माझ्या नवीन घराबद्दल अनिल कपूरला सांगितलं. तेव्हा त्याने मला असं म्हटलं की, “तुम्ही ती काही चौरस फूट जागा खरेदी करू शकत नाही? गरज पडल्यास जमिनीवर झोपा, पण तो फ्लॅट घ्या.” अनिलचं ते बोलणं मी ऐकलं आणि मग ते घर खरेदी केलं.”

यापुढे बोमन इराणींनी घराविषयी असं म्हटलं की, “हे फक्त घर नाही, तर हे माझ्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब आहे. घराच्या भिंतींच्या रंगापासून ते फर्निचरपर्यंत… प्रत्येक गोष्टीत एक कथा लपलेली आहे. या घराबद्दल आम्ही एक टीम म्हणून विचार करतो. या घराविषयी एखाद्याला काही आवडत नसेल तर ते घरात येत नाही. आमच्या घराच्या मध्यभागी एक अशी खोली आहे, जिथे संध्याकाळ बहुतेकदा एकत्र घालवल्या जातात. हे घर कुटुंबाच्या परंपरांचा आधार आहे.”

दरम्यान, वयाच्या ४२ व्या वर्षी बोमन इराणी यांनी प्रत्येक चित्रपटात लहान भूमिका साकारली असली तरी त्यांच्या अभिनयाने आणि त्या भूमिकेने त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘३ इडियट्स’, ‘मैं हूं ना’, ‘वीर जारा’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘खोसला का घोसला’, ‘हे बेबी’, ‘दोस्ताना’, ‘हाउसफुल’, ‘डॉन’, ‘संजू’, ‘डंकी’ अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.