२००५ साली ‘हजारो ख्वाहिशें ऐसी’ या चित्रपटातून अभिनेता शायनी अहूजानं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो अनेक सुपरहिट चित्रपटात झळकला. सध्या तो बराच काळ या झगमगत्या दुनियेपासून दूर आहे. यामागचं कारण म्हणजे बलात्कार प्रकरण. घरातील मोलकरणीनं शायनीवर बलात्काराचा आरोप केल्यामुळे त्याचं फिल्मी करिअर उद्ध्वस्त झालं. याप्रकरणात त्याला ७ वर्षांची शिक्षा सुनावली होती. पण तो सध्या जामिनावर बाहेर आहे. आता याप्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून शायनीला मोठा दिलासा देण्यात आला आहे.
हेही वाचा – “बॉडीमुळे नाही, तर….”, अभिषेक बच्चनने नवोदित अभिनेत्यांना दिला सल्ला; म्हणाला…
अभिनेता शायनी अहुजानं पासपोर्ट नूतनीकरणात अडचणी निर्माण होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शायनीच्या याच याचिकेवर न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या एकल खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्तींकडून सांगण्यात आलं की, “२०११मध्ये काही अटी-शर्थींवर अभिनेत्याचा जामीन मंजूर करण्यात आला होता. याच अटी-शर्थींचे अभिनेत्याकडून कोणतेही उल्लंघन झालं नाही. त्यामुळे अभिनेत्याची पासपोर्ट १० वर्षांसाठी नूतनीकरण करण्याची मागणी पासपोर्ट अधिकाऱ्यांनी मान्य करावी.” उच्च न्यायालयाच्या या निकालामुळे आता अभिनेत्याला पासपोर्ट नूतनीकरण करता येणार आहे.
हेही वाचा – Video: करण कुंद्रानं तेजस्वीला आंटी म्हणून मारली हाक; संतप्त नेटकरी म्हणाले, “३९ वर्षांचा…”
दरम्यान, २००९मध्ये घरातील मोलकरणीनं अभिनेता शायनीविरोधात बलात्कार केल्याची तक्रार दाखली होती. अभिनेत्यानं मुंबईतील घरात त्या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप तिनं केला होता. याप्रकरणी अभिनेत्याला अटक करण्यात आली होती. पण मोलकरणीनं २०११मध्ये आपलं विधान मागे घेतलं. मात्र न्यायालयानं पहिल्या विधानावर आणि वैद्यकीय अहवालावर विश्वास ठेवला.
हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री झळकणार ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेत; दिसणार ‘या’ भूमिकेत
शायनी अहुजाच्या करिअरबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं ‘गँगस्टर’, ‘वो लम्हे’, ‘लाइफ इन ए मेट्रो’, ‘भूल भुलैया’ यांसारख्या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रटातील त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांच्या चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.