आपल्या सुमधूर आवाजाने रसिक श्रोत्यांना कायमच मंत्रमुग्ध करणारे लोकप्रिय गायक म्हणजे कैलाश खेर (Kailash Kher). आजवर त्यांनी अनेक भक्तिगीतांनी रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आपल्या आवाजाने चर्चेत राहणारे कैलाश खेर नुकत्याच एका कारणामुळे चर्चेत आले आहेत. भगवान शिवा यांच्यावर आधारित ‘बबम बम’ हे गाणं गायल्याबद्दल त्यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यामुळे गायकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
कैलाश खेर (Kailash Kher) यांच्या ‘बबम बम’ गाण्याविरुद्ध पंजाबमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या गाण्यात कमी कपडे घातलेल्या महिला आणि चुंबन घेणारे लोक दाखवले आहेत, त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम २९५ अ आणि २९८ अंतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या संपूर्ण प्रकरणी आता उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे.
या खटल्याचा निकाल देताना न्यायमूर्ती डांगरे आणि न्यायमूर्ती चांडक यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, ‘कैलाश खेर (Kailash Kher) यांचा कोणत्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. त्यांनी ‘बबम बम’ हे गाणं फक्त गायलं आहे. कैलाश खेर यांनी गायलेल्या गाण्यात भगवान शिव आणि त्यांच्या शक्तिशाली व्यक्तिमत्त्वाच्या गुणांची स्तुती करण्याशिवाय काहीही नाही. एखाद्या वर्गाला नापसंत वाटणारी प्रत्येक कृती धार्मिक भावना दुखावतेच असे नाही.”
भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ अ अंतर्गत गुन्ह्यासाठी एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण, कैलाश खेर (Kailash Kher) यांच्यावर एकमेव आरोप आहे की ते व्हिडीओमध्ये कमी कपडे घातलेल्या मुलींबरोबर नाचत आहेत. जे तक्रारदाराच्या मते अश्लील आहे, ज्यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावतात. पण, कैलाश खेर यांच्याविरुद्ध हा गुन्हा ठरत नाही, कारण त्यांनी हे जाणूनबुजून केलेलं नाही, ते फक्त यात गाणे गात आहेत.
दरम्यान, पंजाबच्या लुधियाना न्यायालयात तक्रार दाखल केल्यानंतर कैलाश खेर (Kailash Kher) यांनी २०१४ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यावेळी उच्च न्यायालयाने अंतिम निकाल देताना गायकावर कोणतीही दंडात्मक कारवाई करू नये, असे म्हटले होते. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने म्हटले की, त्यांच्याविरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध झाला नाही, कारण त्यांचा भावना दुखावण्याचा द्वेषपूर्ण हेतू नव्हता, ते फक्त गाणे गात होते.