दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली महिला सुपरस्टार मानलं जातं. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. १९९६ साली श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी लग्न केलं. श्रीदेवी बोनी कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यानंतर जानेवारी १९९७ मध्ये जेव्हा बोनी कपूर यांनी आपल्या दुसऱ्या लग्नाची घोषणा केली, त्यावेळी श्रीदेवी गरोदर असल्याचे समोर आलं होतं. त्यामुळे त्या लग्नाअगोदरच गर्भवती असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अनेक वर्षांनंतर बोनी कपूर यांनी या चर्चांवर मौन सोडत स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा- श्रीदेवी यांच्या निधनाबद्दल पती बोनी कपूर यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “कठीण डाएट…”
नुकतचं बोनी कपूर यांनी ‘द न्यू इंडियन’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी श्रीदेवी यांच्याबाबत अनेक खुलासे केले आहेत. बोनी कपूर म्हणाले, “माझं दुसरं लग्न श्रीदेवीबरोबर २ जून १९९६ साली शिर्डीत झालं. त्यानंतर जानेवारी १९९७ मध्ये जेव्हा तिचं पोट दिसू लागलं, तेव्हा आम्ही आमच्या लग्नाची घोषणा केली. १९९७ साली आम्ही सार्वजनिकरित्या लग्न केलं. त्यामुळेच अनेक लोकांना श्रीदेवी लग्नाअगोदरच गरोदर असल्याचे वाटत होतं.”
दरम्यान, या मुलाखतीत बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या निधनाबाबतही भाष्य केलं आहे. बोनी कपूर म्हणाले, “श्रीदेवी प्रचंड कठीण डाएट फॉलो करायची. डॉक्टरांनी तिला कमी रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे जेवणात मीठ खाण्याचा सल्ला दिला होता. परंतु, अनेकदा ती अळणी पदार्थ खायची. निधन झालं त्यादिवशीसुद्धा तिचं डाएट सुरू होतं. अनेकवेळा ती काहीच खायची नाही. माझ्याशी लग्न झाल्यावर अनेकदा तिला ब्लॅकआउट्सचा त्रासही झाला होता. तिने या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही आणि एवढी मोठी दुर्घटना घडली.”
हेही वाचा- “कोणाबरोबरही झोपायला जबरदस्ती…”, नीना गुप्ता यांनी कास्टिंग काउचबद्दल केलेले विधान
एकापेक्षा एक सरस चित्रपटांमध्ये काम करून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या श्रीदेवी यांनी १५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर २०१३ साली ‘इंग्लिश विंग्लिश’ चित्रपटाद्वारे पुनरागमन केले होते. यानंतर त्या २०१८ मध्ये ‘मॉम’ चित्रपटात दिसल्या. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईमध्ये त्यांचे दुःखद निधन झाले. पती बोनी कपूर यांना त्या हॉटेलच्या खोलीतील बाथटबमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या. त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची नोंद समोर आली होती.