Border 2 Movie Update : प्रजासत्ताक दिन असो किंवा स्वातंत्र्यदिन, देशभक्तीपर सिनेमे म्हटलं की, पहिला आठवतो तो ‘बॉर्डर’ सिनेमा आणि त्यातील ‘संदेस आते है’ हे गाणं. १९७१च्या भारत पाकिस्तान युद्धावर आधारित हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये आजही तितकाच लोकप्रिय आहे. अभिनेता सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, सुदेश बेरी आणि पुनीत इस्सार हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. याचबरोबर कुलभूषण खरबंदा , तब्बू , राखी , पूजा भट्ट आणि शरबानी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिकेचं आजही तेवढंच कौतुक केलं जातं. फक्त कलाकारांचा अभिनयच नव्हे तर, सिनेमातील गाण्यांमुळे देखील अनेकांचे डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. अशा या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली. तेव्हापासून या सिनेमाबाबत नवनवीन अपेडट्स समोर येत आहेत.
पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, ‘बॉर्डर’ ( Border 2 ) सिनेमाच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ‘बॉर्डर’च्या दुसऱ्या भागात बॉलीवूडचा चॉकलेट बॉय झळकणार आहे. हा चॉकलेट बॉय दुसरा-तिसरा कोणी नसून वरुण धवन आहे. ‘बॉर्डर’ हा फक्त एक सिनेमाच नाही तर तमाम भारतीयांची या सिनेमाशी नाळ जोडली गेली आहे. अगदी तसंच काहीसं वरुणच्या बाबतीत झाल्याचं दिसून येत आहे.
वरुण स्वत: ‘बॉर्डर’ सिनेमाचा चाहता आहे. त्यामुळे या सिनेमाच्या दुसऱ्या भागात मुख्य भूमिका करायला मिळणं याहून मोठं भाग्य असूच शकत नाही अशी प्रतिक्रिया वरुणने दिली आहे. ‘बॉर्डर २’चे ( Border 2 ) चित्रीकरण नोव्हेंबर २०२४मध्ये सुरू होणार असून सनी देओल आणि वरुण धवन यांची जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. याशिवाय अजून कोणते कलाकार मुख्य भूमिकेत असणार आहेत हे अजूनही गुलदस्त्यात आहे.
हेही वाचा – Video : “माझ्या बाबांना आभाळाएवढं…”, कार्तिकी गायकवाडने वडिलांसाठी गोंदवला खास टॅटू! शेअर केला व्हिडीओ
‘बॉर्डर २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस कधी येणार?
वरुण सध्या ‘बेबी जॉन’ सिनेमात व्यग्र आहे. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर ‘बॉर्डर’च्या ( Border 2 ) दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचं सांगितलं आहे. सिनेमाची मूळ कथा जशीच्या तशी ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल असं सिनेमाच्या निर्मात्यांकडून माहिती देण्यात आली आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी वरुण त्याच्या शरीरावरही तेवढीच मेहनत घेत आहे. २०२६मधील प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर हा सिनेमा भारतीयांच्या भेटीस येणार आहे. जसं पहिल्या भागाला आजचा प्रेक्षक वर्ग अजूनही भरभरुन प्रेम देतो. तसंच सिनेमाच्या दुसऱ्या भागाला देखील प्रेक्षक तेवढीच पसंती देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd