Deb Mukherjee Death: आज देशभरात उत्साहाने धुलीवंदन साजरी केली जात आहे. सगळेजण रंगात रंगून गेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अयान मुखर्जीचे वडील, अभिनेते देब मुखर्जी यांचं दुःखद निधन झालं आहे. वयाच्या ८३व्या वर्षी देब मुखर्जी यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यामुळे बॉलीवूडचे सेलिब्रिटी शोक व्यक्त करत आहेत. काजोल, राणी मुखर्जी, जया बच्चनसह अनेक कलाकार मंडळी अयान मुखर्जीच्या घरी पोहोचले आहेत. रणबीर कपूर, आलिया भट्टदेखील आलिबागहून मुंबईत परतले आहेत.
माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून देब मुखर्जी आजारी होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज १४ मार्चला मुंबईतल्या राहत्या घरी देब यांनी अखेरचा श्वास घेतला. देब मुखर्जी यांच्यावर आज संध्याकाळी विर्लपार्लेच्या पवन हंस स्मशानात अंतिम संस्कार होणार आहेत.
रणबीर कपूर-आलिया भट्ट नुकतेच अलिबागला गेले होते. पण अयानच्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी समजाताच दोघं लेकीला घेऊन पुन्हा मुंबईत परतले. त्यानंतर दोघांनी अयान मुखर्जीच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली.
दरम्यान, देब मुखर्जी यांचं आशुतोष गोवारिकर आणि काजोलबरोबर खास नातं होतं. आशुतोष गोवारिकरचे देब मुखर्जी सासरे होते. सुनीता गोवारिकर या देब यांची मुलगी आहे. तसंच देब यांचा भाऊ शोमू मुखर्जीचं लग्न अभिनेत्री तनुजा यांच्याबरोबर झालं होतं. त्यामुळेच तनुजा यांची मुलगी काजोलचे देब यांच्याबरोबर खूप चांगले संबंध आहेत. काजोल आणि देब मुखर्जी अनेक कार्यक्रमात एकत्र दिसायचे. दोघांच्या व्हिडीओची नेहमी चर्चा रंगायची.
देब मुखर्जी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ६० आणि ७०च्या दशकात देब मुखर्जी यांनी बऱ्याच चित्रपटात काम केलं होतं. १९८३मध्ये ‘कराटे’, १९७९मध्ये ‘बातों बातों में’, १९७८मध्ये ‘मै तुलसी तेरे आंगन की’, १९९२मध्ये ‘जो जीता वही सिकंदर’ अशा बऱ्याच चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. पण, देब मुखर्जी यांना अभिनय क्षेत्रात हवं तसं यश मिळालं नाही.