आमिर खानची निर्मिती आणि किरण रावचं दिग्दर्शन असलेला लापता लेडीज हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता. १९९० ते २००० म्हणजेच मोबाइल नसण्याचा काळ या चित्रपटात चित्रित करण्यात आला आहे. नवं लग्न झालेली नववधू हरवते. शिवाय ज्याच्याशी लग्न झालं आहे त्याच्यासह एक दुसरीच लग्न झालेली स्त्री येते त्यानंतर काय काय घडतं? त्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट आहे. आता हा चित्रपट माझ्या चित्रपटाची कॉपी आहे असं बुर्का सिटी चे दिग्दर्शक फॅब्रिस ब्रॅक यांनी म्हटलं आहे.
फॅब्रिस ब्रॅक यांनी सोडलं मौन
इंडिया टुडेशी बोलताना फॅब्रिस म्हणाले, “लापता लेडीज पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. मला हेच कळलं नाही की बुर्का सिटी आणि लापता लेडीज या दोन्ही चित्रपटांमधल्या प्रसंगांमध्ये इतकं साम्य कसं काय? अर्थात लापता लेडीजमध्ये भारतीय संस्कृतीत काय घडतं ते दाखवण्यात आलं आहे. मात्र हे प्रसंग माझ्या बुर्का सिटीवरुन घेण्यात आले आहेत.”
जवळपास सगळेच प्रसंग…
फॅब्रिस यांना विचारण्यात आलं की कुठले सीन कॉपी केले आहेत सांगा? त्यावर ते म्हणाले “मी काही यादी घेऊन बसलेलो नाही. पण एक भोळसर व्यक्ती आणि त्याची पत्नी हरवणं. दुसऱ्या महिलेचा पती हिंसक असणं, पोलीस अधिकारी भ्रष्ट असणं, घुंघट घेतलेला फोटो दाखवला जातो तो प्रसंग असे सगळे प्रसंग माझ्या शॉर्ट फिल्ममध्ये आहेत.” असं फॅब्रिस यांनी सांगितलं.
आणखी काय म्हणाले फॅब्रिस?
फॅब्रिस पुढे म्हणाले या चित्रपटात एक प्रसंग आहे की दीपक त्याच्या पत्नीला शोधत असतो, विविध दुकानांमध्ये धुंडाळतो. त्यावेळी दुकानदारांशी बोलताना त्यांना घुंगट घेतलेल्या पत्नीचा फोटो दाखवतो. माझ्या शॉर्ट फिल्ममध्येही असंच आहे. माझ्या बुर्का सिटीमध्येही दुकानदाराची पत्नी बुर्का घालून बाहेर येते. जवळपास सगळ्याच प्रसंगांमध्ये साम्य आहे. शेवट करताना जो ट्वीस्ट दिला गेला आहे त्यावेळी आपल्याला कळतं की दोघींमधल्या एका महिलेने जाणीवपूर्वक पळून जायचा निर्णय घेतला आहे. हा सीनही बुर्का सिटीमध्ये आहे. News 18 ने हे वृत्त दिलं आहे.
बिल्पब गोस्वामींचं म्हणणं काय?
फ्रान्सचे दिग्दर्शक फॅब्रिस यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी असंही सांगितलं की बुर्का सिटी असो किंवा लापता लेडीज दोन्हीही चित्रपट महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत संदेश देतात. दरम्यान लापता लेडीज चे लेखक बिप्लब गोस्वामी म्हणाले की या चित्रपटावर कथा चोरल्याचे जे आरोप होत आहेत त्यात तथ्य नाही. आम्ही सिनेमाची कथा, पात्रं काय असतील, संवाद काय बोलतील यासंबंधीचे सगळे पुरावे सादर केले आहेत. २०१४ मध्ये आम्ही स्क्रीन रायटर्स असोसिएशची नोंदणी आम्ही केली होती. तर फिचर फिल्म लेंथ स्क्रिप्ट टू ब्राईड्स याची नोंदणी २०१८ मध्ये आम्ही केली होती.