मागील काही दिवसांपासून बॉलीवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. ‘गदर २’, ‘ओएमजी २’, ‘ड्रीम गर्ल २’ हे चित्रपट जोरदार कमाई करत आहेत. पण आता शाहरुख खान ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे या चित्रपटांवर चांगलाच परिणाम झाला आहे. ‘जवान’ चित्रपट पाहण्याकडे प्रेक्षकांचा कल अधिक वाढला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दमदार कमाई करणाऱ्या ‘गदर २’, ‘ओएमजी २’, ‘ड्रीम गर्ल २’ हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी कमी झाली आहे. हेच लक्षात घेऊन ‘ड्रीम गर्ल २’च्या निर्मात्यांनी प्रेक्षकांना आपल्याकडे वळवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे.
हेही वाचा –“मराठी लोकांमध्ये एकी पाहिजे”; अभिनेते संदीप कुलकर्णी असं का म्हणाले?
आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे अभिनीत ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटाला चांगले यश मिळाले आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी आयुष्मानचा हा एक चित्रपट आहे. पण भारतातील १०० कोटींच्या क्लबमध्ये अजून या चित्रपटाचा समावेश झाला नाही. अशातच ‘जवान’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. यामुळे इतर चित्रपटाच्या निर्मात्यांना पुढील प्रवास अडचणीचा वाटत आहे. शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाने प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत ‘ड्रीम गर्ल २’ निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी एक तिकीट खरेदी करा आणि एक मोफत मिळवा ही नवी ऑफर सुरू केली आहे.
हेही वाचा – “लता दीदी आणि आशाताई यातलं कोण ग्रेट?” विजू मानेंनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटाने प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी १०.६९ कोटींची कमाई केली होती. मग आठवड्याभरानंतर या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला. असं सर्व यश मिळत असताना निर्मात्यांना तिसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर होणाऱ्या कलेक्शनची चिंता वाढली आहे. कारण या तिसऱ्या आठवड्यात ‘ड्रीम गर्ल २’च्या समोर शाहरुखचा ‘जवान’ आहे.
‘ड्रीम गर्ल २’च्या निर्मात्यांनी चित्रपटप्रेमींसाठी ‘वन प्लस वन’ ही ऑफर जाहीर केली आहे. पण आता या ऑफरचा परिणाम बॉक्स ऑफिसवरील कमाईवर होतो की नाही? हे पाहणं महत्त्वाच असेल.