‘महाराजा’ सिनेमाने चीनमध्ये ९१ कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा १०० कोटींच्या टप्प्याजवळ पोहोचत असताना, चीनमध्ये भारतीय चित्रपटांनी आजवर मिळवलेल्या यशावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही काळात, ‘दंगल,’ ‘सिक्रेट सुपरस्टार,’ आणि ‘अंधाधुन’ सारख्या चित्रपटांनी चीनमध्ये मोठा गल्ला जमवला. त्याचप्रमाणे, ‘आरआरआर’ आणि ‘पुष्पा २’ ने जपानसह इतर आशियाई देशांमध्येही चांगली कामगिरी केली. मात्र, हे ब्लॉकबस्टर चित्रपट ५४ वर्षांपूर्वी आलेल्या एका भारतीय सिनेमाचा चीनमधील बॉक्स ऑफिसवरील ‘हा’ रेकॉर्ड तोडू शकलेले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चीनमध्ये ३० कोटी तिकीटांची विक्री करणारा चित्रपट

भारतीय चित्रपटांच्या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल बोलायचे झाल्यास, १९७१ साली प्रदर्शित झालेल्या ‘कारवाँ’ चित्रपटाच्या चीनमधील यशाची पुनरावृत्ती करणे खूप कठीण आहे. अगदी कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात जितेंद्र आणि आशा पारेख प्रमुख भूमिकांमध्ये होते. नासीर हुसेन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट भारतात सुपरहिट ठरला, ३.६ कोटींची कमाई करत १९७१ मधील सहावा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. परंतु, चित्रपटाला खरी प्रसिद्धी ८ वर्षांनंतर चीनमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर मिळाली. चीनमधील पहिल्या प्रदर्शनातच ‘कारवाँ’ने ८.८ कोटी तिकिटे विकलेली, ज्यामुळे तो तेव्हा चीनमधील सर्वाधिक कमाई करणारा परदेशी चित्रपट ठरला. ‘कारवाँ’ची लोकप्रियता इतकी होती की तो चीनमध्ये अनेक वेळा पुन्हा प्रदर्शित करण्यात आला. अशा री-रिलिजमुळे चित्रपटाच्या एकूण प्रेक्षकसंख्येने ३० कोटींचा आकडा पार केला. यामुळे ‘शोले’ने भारतात केलेला विक्रम आणि ‘आवारा’ने सोव्हिएत युनियनमध्ये केलेला विक्रम मागे पडला.

हेही वाचा… गोविंदामुळे मुलगी टीनाला बॉलीवूडमध्ये मिळाले नाही काम; सुनिता आहुजा म्हणाली, “घर चालवण्यासाठी तिला…”

‘दंगल,’ ‘आरआरआर,’ आणि ‘पुष्पा २’पेक्षा ‘कारवाँ’चे यश मोठे का?

‘दंगल’ हा चीनमधील २३८ मिलियन डॉलरच्या कमाईसह सर्वाधिक यशस्वी भारतीय चित्रपट मानला जातो. या चित्रपटाने चीनमध्ये ४.३१ कोटी तिकीटे विकली. तसेच, एसएस राजामौलींच्या ‘आरआरआर’ ने अमेरिका आणि जपानमध्ये विक्रम मोडत इतिहास घडवला. या चित्रपटाने या दोन देशांत सुमारे २० मिलियन डॉलरची कमाई केली, परंतु एकत्रितपणे फक्त ३० लाख तिकीट विकली. ‘पुष्पा २: द रूल’ने भारतात पहिल्या महिन्यात ६ कोटी तिकीटे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अंदाजे १ कोटी तिकीटे विकली आहेत. पण ही आकडेवारीदेखील ‘कारवाँ’ने साध्य केलेल्या यशाच्या जवळपास येऊ शकत नाही.

हेही वाचा…आमिर खानच्या मुलाने ‘लापता लेडीज’साठी दिली होती ऑडिशन; खुलासा करत म्हणाला, “किरणने मला…”

‘कारवाँ’बद्दल थोडक्यात

‘कारवाँ’ हा थिएटरमध्ये सर्वाधिक पाहिला गेलेला भारतीय चित्रपट असावा, कारण त्याने जागतिक स्तरावर ३२ कोटी तिकीटांची विक्री केली आहे. मात्र, यातील बहुतांश तिकिटविक्री री-रिलिजमधून झाल्यामुळे, हा विक्रम ‘शोले’च्या नावावर राहतो. ‘शोले’ने आपल्या मूळ प्रदर्शनादरम्यान २० कोटी तिकिटे विकली होती. ‘कारवाँ’ हा १९५३ च्या ‘गर्ल ऑन द रन’वर आधारित एक क्राईम थ्रिलर होता. यात जितेंद्र, आशा पारेख, अरुणा इराणी, महमूद ज्युनियर, आणि हेलन यांसारखे कलाकार होते. या चित्रपटातील गाणी – ‘चढती जवानी,’ ‘पिया तू अब तो आजा,’ ‘दिलबर दिल से प्यारे,’ आणि ‘कितना प्यारा वादा’ – प्रचंड लोकप्रिय झाली होती. ‘कारवाँ’ने जागतिक स्तरावर ३५ कोटींची कमाई केली, ज्यामुळे तो ७० आणि ८०च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटांमध्ये गणला जातो.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Caravan the indian film that sold 30 crore tickets in china more than dangal pushpa 2 and rrr psg