बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानसाठी २०२३ हे वर्षं फारच उत्तम होतं. ‘पठाण’ व ‘जवान’सारखे १००० कोटींहून अधिक कमाई करणारे चित्रपट शाहरुखने दिले. २०२३ हे वर्षं शाहरुख खानचं आहे असं म्हंटलं तरी ती अतिशयोक्ति होणार नाही. २ नोव्हेंबर म्हणजेच आपल्या वाढदिवशी शाहरुखने त्याचा आगामी चित्रपट ‘डंकी’चा पहिला टीझर प्रदर्शित केला. सोशल मीडियावर या टीझरला उत्तम प्रतिसाद मिळाला असून चाहते शाहरुखच्या या नव्या चित्रपटासाठी फार उत्सुक आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले आहे. यानिमित्ताने शाहरुख व राजकुमार हिरानी प्रथमच एकत्र काम करणार आहेत. नुकतंच या चित्रपटातील पहिलं गाणं ‘लूट पूट गया’ प्रदर्शित झालं असून लोकांचा त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासूनच याच्या कथेबद्दल वेगवेगळ्या गोष्टी कानावर पडल्या होत्या. हा चित्रपट भारतातून अवैध पद्धतीने स्थलांतरित झालेल्या लोकांवर भाष्य करणार असल्याचं स्पष्ट झाले. खुद्द शाहरुखनेही या गोष्टीची पुष्टी केली आहे.
नुकतंच कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी ‘डंकी’बद्दल भाष्य केलं आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना मुकेश छाब्रा यांनी ‘डंकी’ची तुलना थेट राजकुमार हिरानी यांच्या ‘३ इडियट्स’शी केली आहे. मुकेश छाब्रा म्हणाले, “हा चित्रपट सगळे रेकॉर्ड मोडीत काढणार आहे. इतकंच नव्हे तर ‘डंकी’ हा ‘३ इडियट्स’पेक्षा १०० पटीने उत्तम आहे.” मुकेश यांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.
‘जवान’प्रमाणेच शाहरुखच्या ‘डंकी’मध्येही मुकेश छाब्रा यांनी छोटीशी भूमिका साकारली असल्याचं त्यांनी या स्पष्ट केलं. प्रेक्षक आणि शाहरुखचे चाहते या चित्रपटाची फार आतुरतेने वाट बघत आहेत. बॉलिवूड हंगामाच्या रीपोर्टनुसार ‘डंकी’च्या स्क्रीनिंगसाठी नेपाळ, कॅनडा, अमेरिका, युके अशा वेगवेगळ्या देशातून शाहरुखचे चाहते हजेरी लावणार आहेत. ‘डंकी’ २१ डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘डंकी’मध्ये शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.