आपण एखादा चित्रपट बघतो तेव्हा त्यातील बऱ्याच बारीक सारिक गोष्टींकडे आपलं लक्ष नसतं. चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, संगीत, कॉस्च्युम याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कास्टिंग. कोणत्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे हे निश्चित करणं यालाच कास्टिंग असं म्हणतात. हे काम करणाऱ्याला कास्टिंग डायरेक्टर म्हटलं जातं, आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अशाच एका मोठ्या कास्टिंग डायरेक्टरचं नाव म्हणजे मुकेश छाबरा.
आज मुकेश यांच्या नावाला इंडस्ट्रीमध्ये एक प्रकारचं वजन आहे. लहानातल्या लहान कलाकारापासून महानायक अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत कित्येकांचं कास्टिंग मुकेश करतात. नुकतंच मुकेश छाबरा यांनी यूट्यूबवरील ‘द रणवीर शो’ या चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी कास्टिंग क्षेत्रातील वेगवेगळे अनुभव शेअर केले. याबरोबरच या मुलाखतीमध्ये मुकेश यांनी सुशांत सिंह राजपूतबद्दल आणि एकूणच मानसिक स्वास्थ्याविषयी खुलासा केला आहे.
आणखी वाचा : वीरेंद्र सेहवागने सांगितला पाकिस्तान दौऱ्यावरचा ‘तो’ किस्सा; म्हणाला “तिथल्या लोकांनी आम्हाला…”
सुशांत सिंह राजपुतबद्दल बोलताना मुकेश बरेच भावूक झाले. ते म्हणाले, “काय पो चे चित्रपटादरम्यानच सुशांतने मला सांगितलं की तो माझ्या पहिल्या चित्रपटात काम करेल, आणि त्याने तसं केलंही. त्याने कोणतीही कथा न ऐकता ‘दिल बेचारा’साठी होकार दिला. लोक म्हणतात की मृत्यूआधी काही दिवस तो नैराश्यात होता, त्यांचं मानसिक संतुलन ठीक नव्हतं, पण माझ्यामते तसं काहीच नव्हतं, त्याचा मूड ऑफ असायचा पण तो डिप्रेशनमध्ये आहे असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आपल्या देशात आजकाल डिप्रेशन, नैराश्य अशा मोठ्या मोठ्या शब्दांना फार महत्त्व प्राप्त झालंय असं वाटतं. एखाद्या व्यक्तीचा मूड थोडा खराब असेल तरी लगेच लोक त्याला डॉक्टरकडे जायचा सल्ला देतात, पण त्या काळात सुशांतचा मूड ठीक नसायचा याचा अर्थ तो डिप्रेशनमध्ये होता हे सरसकट ठरवणं योग्य नाही.”
या मुलाखतीमध्ये मुकेश यांनी सुशांत सिंह राजपुतच्या कामाची पद्धतीची खूप प्रशंसा केली. ‘काय पो चे’. ‘एम एस धोनी’, ‘केदारनाथ’सारख्या चित्रपटातील पात्रासाठी सुशांत जीव तोडून मेहनत करायचा हेदेखील त्यांनी सांगितलं. त्याची काम करायची पद्धतच वेगळी होती असं त्यांचं म्हणणं आहे. १४ जून २०२० रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमागील कोडं अजूनही उलगडलेलं नाही.