आधी ‘पठाण’ अन् आता ‘जवान’ अशा दोन्ही चित्रपटांच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा किंग खान शाहरुख खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. दोन्ही चित्रपटांनी १००० कोटींचा टप्पा पार केल्याने आता शाहरुखच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाकडून असणाऱ्या अपेक्षा वाढल्या आहेत. ‘डंकी’च्या माध्यमातून शाहरुख खान व राजकुमार हिरानी हे प्रथमच एकत्र काम करणार आहेत.
‘डंकी’ची कथा ही आपल्या देश सोडून परदेशात स्थलांतरित झालेल्या लोकांवर बेतलेली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतंच चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी या ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या दिलेल्या मुलाखतीमध्ये याबद्दल भाष्य केलं. सोशल मीडियावर त्यांचा या मुलाखतीमधील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : ‘टायगर ३’च्या पहिल्या गाण्याचा टीझर प्रदर्शित; तब्बल १० वर्षांनी अरिजीत सिंहने गायले सलमानसाठी पहिले गाणे
या मुलाखतीमध्ये मुकेश छाब्रा म्हणाले, “राजकुमार हिरानी यांच्याबरोबर हा माझा तिसरा चित्रपट आहे. ‘पीके’, ‘संजू’ आणि इतरही काही जाहिरातींसाठी आम्ही एकत्र कं केलं आहे. खरं सांगायचं झालं तर ‘डंकी’विषयी फार काही बोलण्याची आम्हाला परवानगी नाही. हा एक असा चित्रपट आहे जो प्रत्येक घरात, प्रत्येकाच्या हृदयात घर करेल. ‘डंकी’ विषयी तुम्ही १० वर्षांनीही तुम्ही चर्चा कराल इतका हा सुंदर चित्रपट आहे. हा चित्रपट म्हणजे शाहरुख खान व राजकुमार हिरानी यांचं सर्वात उत्तम जुळून आलेलं समीकरण आहे. असं समीकरण पुन्हा इंडस्ट्रीत समोर येणार नाही.”
पुढे मुकेश छाब्रा म्हणाले, “डंकी हा फार वेगळाच विषय आहे. राजकुमार हिरानी यांचे चित्रपट प्रेक्षकांचं मनोरंजन करतात पण त्याबरोबरच ते प्रेक्षकांच्या डोक्याला खाद्यही पुरवतात. तसाच तुम्ही या चित्रपटाचाही मनापासून आस्वाद घ्याल. हा चित्रपट तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. मीदेखील हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यास फार उत्सुक आहे.”
याबरोबरच ‘जवान’प्रमाणेच शाहरुखच्या ‘डंकी’मध्येही मुकेश छाब्रा यांनी छोटीशी भूमिका साकारली असल्याचं त्यांनी या मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. किंग खानचे चाहते आणि सिनेप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. ‘डंकी’मध्ये शाहरुखसह तापसी पन्नू, विकी कौशल यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. येत्या २२ डिसेंबर २०२३ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.