एखादा चित्रपट सुपरहिट व्हावा यासाठी संपूर्ण टीमला एकजुटीने मेहनत घ्यावी लागते. यामध्ये कलाकारांचा सर्वात मोठा वाटा असतो. रुपेरी पडद्यावर एखादा चित्रपट आल्यानंतर यात या कलाकारांऐवजी दुसरे कलाकार असते तर चित्रपट आणखी चालला असता, अशा चर्चा अनेक चित्रपटांबद्दल होतात. त्यामुळे चित्रपट बनवताना कास्टिंग डायरेक्टर यांचं कामही अत्यंत महत्त्वाचं असतं. अशात बॉलीवूडच्या तुफान गाजलेल्या ‘३ इडियट्स’मधील कलाकारांच्या निवडीबाबत एक माहिती समोर आली आहे.
प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर रोहन मापुस्कर यांनी ‘३ इडियट्स’च्या कलाकारांची निवड करतानाचा एक खुलासा केला आहे. रोहन मापुस्कर यांनी आजवर बॉलीवूडसह अनेक मराठी चित्रपटांसाठी कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. त्यांनी निवडलेल्या कलाकारांमुळे आजवर अनेक चित्रपट सुपहिट ठरले आहेत. नुकतेच रोहन मापुस्कर यांनी सौमित्र पोटेच्या ‘मित्रम्हणे’ या मराठी पॉडकास्टला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी चित्रपटांमध्ये विविध पात्रांसाठी कलाकारांची निवड कशी केली जाते यावर गप्पा मारल्या. तसेच ‘३ इडियट्स’ या चित्रपटासाठी कलाकारांच्या निवडीबाबत एक मोठा खुलासा केला आहे.
रोहन मापुस्कर यांनी सांगितलं, “आताचे जे स्टार आहेत ते त्यावेळी सगळेच ऑडिशनला येऊन गेले होते. यामध्ये अनुष्का शर्मा, राजकुमार राव, जॅकलिन फर्नांडिस, अमितोष नागपाल, गुरमित चौधरी, पुलकित सम्राट, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी असे जे सध्या मोठे स्टार आहेत, सर्व त्या चित्रपटासाठी ऑडिशनला आले होते.”
‘ही’ मराठमोळी अभिनेत्री साकारणार होती पिया
‘३ इडियट्स’ या चित्रपटामध्ये बॉलीवूडची बेबो करीना कपूर नाही तर मराठमोळी चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकर दिसणार होती. पिया या पात्रासाठी तिची निवड करण्यात आली होती. हा किस्सा सांगताना रोहन मापुस्कर म्हणाले, “करीना कपूरच्या आधी अमृता खानविलकर डन झाली होती. मी पैशांसाठी तिला कॉलसुद्धा केला होता. की, तू यासाठी किती पैसे घेतेस. शर्मनच्या रोलसाठी जितेंद्र जोशीला घेण्यात येणार होतं.”
करीना कपूरची निवड कशी झाली
पुढे अमृता खानविलकर ऐवजी करीना कपूरची निवड कशी झाली याची माहिती सांगताना रोहन मापुस्कर म्हणाले, “सर्वात पहिले या चित्रपटात शाहरुख खान असणार होता. त्यावेळी हा चित्रपट सिक्कीमवर आधारित होता, पण स्क्रिप्ट ऐकल्यावर आमिर खानने हो म्हटलं, तसा संपूर्ण चित्रपटच बदलला. संपूर्ण स्क्रिप्ट लदाखला ट्रान्सफर झाली, त्यानंतर सगळे कलाकार बदलावे लागले.”
रोहन मापुस्कर यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी मनोरंजन विश्वातील अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी कलाकारांची निवड केली आहे. यामध्ये २००९ मधील ‘३ इडियट्स’, ‘हाफ टिकीट’, ‘वेंटिलेटर’, ‘सचिन: ए बिलियन ड्रीम्स’ असे अनेक चित्रपट आहेत.