Raid 2 Movie: २०१८ मध्ये बॉक्स ऑफिसवर धाड टाकून धुमाकूळ घालणारा अमय पटनायक आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अजय देवगण, रितेश देशमुख आणि वाणी कपूर अभिनीत ‘रेड २’ चित्रपट १ मेला प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या जबरदस्त ट्रेलरमुळे प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, प्रदर्शनाच्या एक दिवसाआधी सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना ‘रेड २’ चित्रपटात काही बदल करण्याचा निर्देश दिले आहेत.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात अजय देवगण व सौरभ शुक्ला यांच्यातील द्वंद प्रेक्षकांच्या खूप पसंतीस पडलं होतं. तेव्हापासून ‘रेड’ चित्रपटाच्या सीक्वेलची प्रेक्षक प्रतीक्षा करत होते. अखेर १ मेला ‘रेड २’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अजय देवगण नायक असला तरी त्याच्या तोडीस असा खलनायक रितेश देशमुखला दाखवण्यात आलं आहे. रितेश दादा मनोहर भाईच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे आता ‘रेड २’ मध्ये अजय व रितेशमधलं नवं द्वंद पाहायला मिळणार आहे.
‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने ‘रेड २’ चित्रपटाला हिरवा झेंडा दाखवला होता. कोणताही सीन हटवण्यास सांगितलं नव्हतं. सर्वकाही जसंच्या तसं ठेवायला सांगितलं होतं. पण आता बोर्डाने प्रदर्शनाच्या मुहूर्तावरच निमार्त्यांना दोन डायलॉग्स बदलण्यास सांगितलं आहे. शिवाय चित्रपटातील ८ सेकंदाचा डायलॉग हटवण्यास सांगितलं आहे.
माहितीनुसार, जिथे रेल्वे मंत्री शब्दाच्या जागी मोठे मंत्री असा बदल केला आहे. तसंच चित्रपटाच्या सुरुवातीला येणारा ८ सेकंदाचा “पैसा, हथियार, ताकत” हा डायलॉग हटवण्यास सांगितलं आहे. ‘रेड २’ चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) कडून सेन्सर सर्टिफिकेट मिळालं असून UA 7+ रेटिंग दिलं आहे. ‘रेड २’ चित्रपट १५० मिनिट, ५३ सेकंद म्हणजे २ तास ३० मिनिट, ५३ सेकंद एवढा आहे.
दरम्यान, ‘रेड २’ चित्रपटाच्या निर्मितीची धुरा भूषण कुमार, अभिषेक पाठक, कृष्ण कुमार आणि गौरव नंदा यांनी सांभाळली आहे. तसंच राज कुमार गुप्ता यांनी दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर व्यतिरिक्त रजत कपूर, सौरभ शुक्ला, सुप्रिया पाठक आणि अमित सियाला महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘रेड २’ चित्रपटात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराची कथा पाहायला मिळणार आहे.