Sanjeev Kapoor on Amitabh Bachchan: सेलिब्रिटी मास्टर शेफ संजीव कपूर यांनी नुकतीच ‘माशाबल इंडिया’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबाबतचे अनेक किस्से सांगितले.
संजीव कपूर काय म्हणाले?
संजीव कपूर यांना विचारले की, त्यांना कधी विमानतळावर चुकून इतर कलाकारांच्या नावाने संबोधले आहे का? त्यावर संजीव कपूर म्हणाले, “हे खूप वेळा होतं. लोक माझ्या नावाबद्दल गोंधळलेले असतात. कारण- माझा चेहरा ओळखीचा तर वाटतो; पण मी नेमका कोण आहे, हे लोकांच्या पटकन लक्षात येत नाही. मला कोणी विचारलं की, सर तुमचं नाव काय आहे? तर त्यावर मी माझं ठरलेलं उत्तर देतो. मी त्यांना सांगतो की, माझं नाव अमिताभ बच्चन आहे.
अमिताभ बच्चन व संजीव कपूर यांनी एका जाहिरातीत एकत्र काम केले होते. त्या शूटिंगदरम्यानचा एक किस्सा संजीव कपूर यांनी सांगितला. संजीव कपूर म्हणाले, “आम्ही एका जाहिरातीत एकत्र काम करीत होतो. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, मी विमानतळावर माझं नाव अमिताभ बच्चन आहे, असं सांगतो. आम्हाला एकत्र काम करताना अवघडल्यासारखं वाटत नव्हतं. विशेष बाब म्हणजे काही गोष्टींना आमच्या प्रतिक्रिया सारख्याच होत्या. त्यामुळे माझ्या मनात विचार आला की, ते माझ्यासारखा विचार करतात किंवा मी त्यांच्यासारखा विचार करतो. आम्ही सारखेच होतो.”
संजीव कपूर यांनी आणखी एक किस्सा सांगितला. लोक त्यांना खाण्याच्या जगातील अमिताभ बच्चन असे म्हणतात. मी अमिताभ बच्चन यांना याबद्दल सांगितले की, लोक मला जवळजवळ हे दररोज सांगतात. पण, यामध्ये एक समस्या आहे. मी लोकांना सांगतो की, मी खाण्याच्या जगातील अमिताभ बच्चन आहे, हे ऐकण्यात मजा नाही. मजा त्या दिवशी येईल, ज्या दिवशी लोक तुम्हाला म्हणतील की, तुम्ही अभिनयाच्या क्षेत्रातील संजीव कपूर आहात.
पुढे संजीव कपूर असेही म्हणाले की, मी अमिताभ बच्चन यांना सांगितले आहे की, जर असे कधी झाले, तर मला कळवा. मात्र, अद्याप मला अमिताभ बच्चन यांच्याकडून असा काही मेसेज मिळालेला नाही.
संजीव कपूर यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन खूप प्रेमळ आहेत. शूटिंगआधी मी त्यांची वाट बघत होतो. जेव्हा ते आले तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी गेलो. मी विचार केलेला की, मी त्यांना नमस्कार करेन. मात्र, मी जसा त्यांच्याजवळ पोहोचलो, तेव्हा ते उठून उभे राहिले आणि माझा हात हातात घेऊन म्हणाले की, तुमच्याबरोबर काम करायला मिळालं, हा माझा सन्मान आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. ते किती वक्तशीर आहेत, हे सगळ्यांना माहीत आहेच. पण, त्या दिवशी त्यांना वेळ झाला. त्यामुळे उशिरा आल्याबद्दल त्यांनी माझी मागितली. त्यांना असं काहीही करण्याची गरज नव्हती. मात्र, तरीही त्यांनी ते केलं. त्यांच्याकडून खूप प्रेरणा मिळते.
दरम्यान, अमिताभ बच्चन हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असतात. ब्लॉगच्या माध्यमातून ते अनेक गोष्टी शेअर करीत असतात. त्यांच्या मनातील विचार, किस्से, आठवणी ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन यांची कल्की २८९८ एडी या चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती. आता आगामी काळात ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.