अभिनेता अक्षय कुमार(Akshay Kumar) हा काही दिवसांपासून त्याच्या स्काय फोर्स या चित्रपटामुळे चर्चेत होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र अभिनेता त्याच्या चित्रपटामुळे नाही, तर त्याने घर विकल्यामुळे चर्चेत आला आहे. अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांनी त्यांचे मुंबईतील त्यांचे लक्झरी अपार्टमेंट विकले आहे. मुंबईतील ओबेरॉय ३६० पश्चिम प्रकल्पातील हे अपार्टमेंट सी फेसिंग आहे. आता या सेलेब्रिटी जोडप्याने हे अपार्टमेंट किती रुपयांना विकले, हे जाणून घेऊ…
अक्षय कुमारने किती कोटीला विकले घर?
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांनी हे अपार्टमेंट ८० कोटी रुपयांना विकले आहे. इंडेक्सटॅप (IndexTap)च्या नियंत्रणात असलेल्या मालमत्तेच्या कागदपत्रांनुसार,अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना यांचे अपार्टमेंट ओबेरॉय ३६० पश्चिम प्रकल्पात ३९ व्या मजल्यावर आहे. ६,८३० चौरस फूट इतकी या अपार्टमेंटची जागा आहे. अक्षय-ट्विंकलच्या अपार्टमेंटची प्रतिचौरस फूट किंमत १.१७ लाख आहे. या अपार्टमेंटला चार कार पार्किंगचीसुद्धा जागा आहे. ३१ जानेवारीला नोंदणी केलेल्या कागदपत्रांनुसार ४.८० कोटी रुपये मुद्रांक शुल्क म्हणून भरण्यात आले आहेत.
अक्षय कुमार-ट्विंकल खन्ना यांच्याशिवाय ओबेरॉय ३६० पश्चिम प्रकल्पात अन्य काही बॉलीवूड कलाकारांचेही सोई-सुविधांनी युक्त असे अपार्टमेंट आहे. त्यामध्ये शाहिद कपूर, अभिषेक बच्चन यांचा समावेश आहे. शाहिद कपूर व मीरा कपूर यांनी मे २०२४ मध्ये ५,३९५ चौरस फूट क्षेत्रफळ असलेले अपार्टमेंट खरेदी केले होते. त्याची किंमत ६० कोटी इतकी होती.
दरम्यान, अक्षय कुमारने याआधी मुंबईतील बोरिवली-पू्र्व येथील एक अपार्टमेंट ४.२५ कोटींना विकले होते. हे अपार्टमेंट त्याने नोव्हेंबर २०१७ मध्ये २.३८ कोटी रुपयांना खरेदी केले होते. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांनीदेखील मुंबई, अंधेरी (पश्चिम) येथील घर १२.८५ कोटींना विकले. काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी मुंबईतील ओशिवरा येथील ड्युप्लेक्स अपार्टमेंट ८३ कोटींना विकले. मालमत्ता नोंदणी कागदपत्रांनुसार, बिग बींनी हे अपार्टमेंट एप्रिल २०२१ मध्ये ३१ कोटी रुपयांना खरेदी केले होते. त्यांनी ते ८३ कोटी रुपयांना विकले.