अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाचा टीझर दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. तर, ट्रेलर अजून रिलीज करण्यात आलेला नाही. चित्रपट ११ ऑगस्ट रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र, सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप नोंदवला आहे. यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असं सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांचं म्हणणं आहे.
‘ओह माय गॉड २’मधील व्हिडीओ शेअर करताच नेटकऱ्यांचा अक्षय कुमारला इशारा; म्हणाले, “हिंदू देवांचा…”
भगवान शिव यांचा रेल्वेच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात येतो, असे एक दृश्य या चित्रपटात आहे. यावर आक्षेप घेण्यात आल्याचं प्राथमिक वृत्त आहे. सेन्सॉर बोर्डाने अक्षयचा ‘ओएमजी २’ हा चित्रपट रिव्ह्यू समितीकडे परत पाठवला आहे. चित्रपटातील काही दृश्ये आणि संवाद आक्षेपार्ह असल्याचं बोललं जात आहे. पण याबद्दल सेन्सॉर बोर्डाने अद्याप माहिती दिलेली नाही.
‘हर हर महादेव’चा जयघोष! अक्षय कुमारच्या बहुचर्चित ‘OMG 2’ चा दमदार टीझर प्रदर्शित
‘आदिपुरुष’वरून झालेला वाद पाहता सेन्सॉर बोर्ड या चित्रपटाबाबत अत्यंत सावध दिसत आहे. त्यांना चित्रपटाबद्दल कोणत्याही प्रकारचा वाद नको आहे, त्यामुळे तो पुन्हा रिव्ह्यू कमिटीकडे पाठवण्यात आला आहे. एका सूत्राने ‘इंडिया टुडे’ला सांगितले की, हा चित्रपट रिव्ह्यू कमिटीकडे पाठवण्यात आला आहे जेणेकरून संवाद आणि दृश्यांवर कोणताही वाद होऊ नये. ‘आदिपुरुष’मुळे ज्याप्रकारे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या, तसं या चित्रपटामुळे घडू नये. चित्रपटाचा विषय देवाशी निगडीत आहे, त्यामुळे त्याचा रिव्ह्यू काळजीपूर्वक केला जाईल.
‘ओ माय गॉड २’ मध्ये सुपरस्टार अक्षय कुमार, अभिनेते पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतम मुख्य भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाचे संवाद लेखन आणि दिग्दर्शन अमित राय यांनी केलंय. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी ‘गदर २’ देखील रिलीज होत आहे.