अक्षय कुमारच्या आगामी ‘ओह माय गॉड २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेले काही दिवस हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. अनेकांनी या चित्रपटाच्या टीझरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांवर आक्षेप घेतला. आता या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्ड अतिशय काळजीपूर्वक पावले उचलत आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) च्या रिव्हाइजिंग टीमने हा चित्रपट पाहिला. स्क्रिनिंगला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी स्वतःही उपस्थित होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाच्या निर्मात्यांना सेन्सॉर बोर्डाकडून २० कट सुचवण्यात आले आहेत आणि प्रौढ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. चित्रपटाला A प्रमाणपत्र देणे म्हणजे १८ वर्षाखालील मुले हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू शकत नाहीत.
अशा परिस्थितीत अक्षय कुमार आणि ‘ओह माय गॉड २’च्या निर्मात्यांचं टेंशन वाढलं आहे. ‘इ टाइम्स’च्या वृत्तानुसार, या संदर्भात निर्मात्यांना अद्याप ‘कारणे दाखवा’ नोटीस पाठवण्यात आलेली नाही. सीबीएफसी कार्यकारी समितीने चित्रपट पाहिल्यानंतर जे गाणे रिलीज झालं, चित्रपटाच्या रिलीजची तारीख दाखवण्यात आली नव्हती. रिलीजसाठी फारच थोडेच दिवस शिल्लक असताना, चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचा अंतिम निर्णय अक्षय कुमार घेतला जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्या तो देशाबाहेर आहे. अशा परिस्थितीत चित्रपट पुढे ढकलावा लागेल असे बोलले जात आहे.
यापूर्वी हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार होता. रिपोर्ट्सनुसार, ‘जिओ सिनेमा’बरोबर निर्माते डील करत होते. कदाचित ९० कोटींना हा करार होणार होता, पण नंतर अचानक हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ११ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.