शाहीद कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. हा रोमँटिक ड्रामा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. या चित्रपटात एका मराठी अभिनेत्रीने काम केलं आहे. तिने स्वतः याबद्दल पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.
‘चला हवा येऊ द्या’ फेम स्नेहल शिदम ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात झळकली आहे. तिने शाहीद कपूरबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. चित्रपटात तिचे शाहीदबरोबर सीन आहेत. “कळवायला उशीर आणि आनंद दोन्ही होतोय. शाहीद कपूर आणि क्रिती सेनॉन यांचा नवीन हिंदी सिनेमा “तेरी बातो में ऐसा उलझा जिया” नुकताच प्रदर्शित झाला आहे. यात माझी एक छोटीशी भूमिका आहे. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन सिनेमा नक्की बघा आणि कसा वाटतोय ते सांगा. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असेच राहुद्या,” असं स्नेहलने इन्स्टाग्रामवर शाहीदबरोबरचा फोटो शेअर करत लिहिलं आहे.
‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ हा चित्रपट पाहणाऱ्या अनेक प्रेक्षकांना मराठमोळ्या स्नेहल शिदमला पडद्यावर पाहून आश्चर्याचा धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर स्नेहलचे व्हिडीओ शेअर केले आहेत. स्नेहलचा हा पहिलाच चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात शाहीद कपूरबरोबर स्क्रीन शेअर करणाऱ्या स्नेहलचं चाहते खूप कौतुक करत आहेत. तिने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंट करून तिला चाहते व अभिनयक्षेत्रातील लोक शुभेच्छा देत आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्रीने गुजराती बिझनेसमनशी गोव्यात बांधली लग्नगाठ, भर मंडपात केलं लिपलॉक, Photos चर्चेत
दरम्यान, शाहीद कपूरच्या चित्रपटात मराठी कलाकार झळकण्याची ही पहिलीच वेळ नाही. शाहीदच्या ‘कबीर सिंग’ चित्रपटात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातने काम केलं होतं. तर, गेल्या वर्षी आलेल्या त्याच्या ‘फर्जी’ या वेब सीरिजमध्ये ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रियदर्शिनी इंदलकर झळकली होती. आता त्याच्या ‘तेरी बातों में ऐसा उलझा जिया’ या चित्रपटात स्नेहल शिदमने काम केलं आहे.