कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षीत ‘चंदू चॅम्पियन’ सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. अखेर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. आकडेवारी पाहता चित्रपटाने फार चांगली सुरुवात केली नसल्याचं दिसून येत आहे.
‘चंदू चॅम्पियन’ हा २०२४ या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट होता. हा चित्रपट अखेर चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटासाठी कार्तिक आर्यनने खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटात कार्तिकने आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. भरपूर प्रमोशन करून आणि चर्चा असूनही, ‘चंदू चॅम्पियन’ची सुरुवात संथ राहिली. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे समोर आले आहेत.
‘चंदू चॅम्पियन’कडून निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. या चित्रपटाची चर्चा पाहता बॉक्स ऑफिसवर बंपर ओपनिंग होईल असं वाटत होतं. कार्तिक आर्यननेही आपल्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली होती आणि आपल्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं, मात्र, ‘चंदू चॅम्पियन’ची पहिल्या दिवसाची कमाई फार चांगली राहिलेली नाही. इंडस्ट्री ट्रॅकर ‘सॅल्कनिक’च्या पहिल्या दिवसाच्या प्रारंभिक आकडेवारीनुसार, या चित्रपटाने ४.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हे चित्रपटाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे आहेत, अधिकृत आकडेवारी आल्यानंतर त्यात थोडे बदल होऊ शकतात.
एव्हरग्रीन Couple! २८ वर्षांपूर्वी ‘असे’ दिसायचे ऐश्वर्या व अविनाश नारकर, लग्नाचा फोटो पाहिलात का?
‘चंदू चॅम्पियन’ची बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवसाची कामगिरी फार चांगली राहिली नाही, पण वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत वाढ होईल व त्याचं कलेक्शन पहिल्या दिवसापेक्षा चांगलं होईल, अशी आशा निर्मात्यांना आहे. या चित्रपटाचं बजेट तब्बल १२० कोटी रुपये आहे, ते पाहता पहिल्या दिवशी झालेली सुरुवात निराशाजनकच म्हणावी लागेल. आता शनिवार आणि रविवारी हा चित्रपट किती कलेक्शन करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
बायोपिक आहे ‘चंदू चॅम्पियन’
‘चंदू चॅम्पियन’ हा देशातील पहिले पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांचा बायोपिक आहे. या चित्रपटात कार्तिकने मुरलीकांत यांची मुख्य भूमिका साकारली आहे. मुरलीकांत यांचा एक सैनिक आणि बॉक्सर होण्यापासून ते गंभीर दुखापतीतून बरा झाल्यानंतर जलतरणपटू होण्यापर्यंतचा आश्चर्यकारक प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व्यतिरिक्त भुवन अरोरा, राजपाल यादव, यशपाल शर्मा, विजय राज, अनिरुद्ध दवे, पलक लालवानी आणि इतर कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.