बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला काही दिवसांपूर्वीच हृदयविकाराचा झटका आला होता. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली होती. सुश्मिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन वडिलांबरोबरचा हसरा फोटो शेअर करत तिच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांना माहिती दिली. अँजिओप्लास्टीही करण्यात आल्याचं सुश्मिताने पोस्टमध्ये म्हटलं होतं.
सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच तिच्या चाहत्यांनीही चिंता व्यक्त केली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सुश्मिताच्या पोस्टवर कमेंट करत तिला काळजी घेण्यास सांगितलं आहे. सुश्मिताचा भाऊ राजीव सेननेही काळजी व्यक्त करत तिच्यासाठी पोस्ट शेअर केली होती. राजीवने सुश्मिताबरोबरचा फोटो शेअर करत “माझी खंबीर बहीण. भाऊ तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो”, असं म्हटलं होतं. आता राजीवची पत्नी व सुश्मिताची वहिनी असलेल्या चारू असोपानेही तिच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे.
चारू असोपाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सुश्मिताची पोस्ट शेअर केली आहे. “आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. दीदी तुम्ही सगळ्यात खंबीर महिला आहात”, असं चारू असोपाने पोस्टमध्ये म्हटलं आहे. मिस युनिव्हर्स असलेली सुश्मिता तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसते. वयाच्या ४५शीतही फिट राहणाऱ्या सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुश्मिताला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं. शिवाय तिची अँजिओप्लास्टीही करण्यात आली. सध्या सुश्मिताची प्रकृती ठीक असल्याचं अभिनेत्रीने सांगितलं आहे.