सलमान खान(Salman Khan) व रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘सिकंदर’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळत आहे. ३० मार्चला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता या सगळ्यात लेखक चेतन भगत(Chetan Bhagat)ने सलमान खानबद्दल केलेले वक्तव्य चर्चेत आहे. सलमान खानच्या काही चित्रपटांच्या कथा चेतन भगतने लिहिल्या आहेत. त्यामध्ये किक या चित्रपटाचा समावेश आहे.

सलमान खान काय म्हणाला होता?

चेतन भगतने नुकतीच ‘लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. यावेळी त्याने सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. चेतन भगत जेव्हा बँकेत नोकरी करत होता. तेव्हा त्याने वन नाइट अॅट कॉल सेंटर या पुस्तकाचे हक्क सलमानला विकले होते. हॅलो या चित्रपटाची कथा या पुस्तकावर आधारित आहे. जेव्हा चेतन भगत सलमान खानला त्याच्या घरी भेटण्यासाठी गेला तेव्हा काय घडले हे सांगताना चेतन भगत म्हणाला, “सलमान खानच्या घरी गेल्यानंतर मला एका वेगळ्या जगात गेल्यासारखे वाटले. सलमान खानला मी भेटलो आणि त्याने मला त्याच्याबरोबर काम करण्याची संधी दिली. त्याला मी सांगितले की, मी रोज बँकेत काम करणारी व्यक्ती आहे. त्यावर सलमान खान मला म्हणाला की, तू माझ्याबरोबर पुढच्या चित्रपटात काम करणार आहेस.”

चेतन भगतने या मुलाखतीत म्हटले की, ‘हॅलो’ चित्रपटाच्या वेळी आमच्यात खूप कमी संवाद झाला होता. मात्र, त्यानंतर आम्ही किक या चित्रपटात एकत्र काम केले. चेतन भगत पुढे म्हणाला, “मी फार कमी वेळा चित्रपटाच्या सेटवर जात असे. फार कमी वेळा सलमान खानशी बोलत असे. ‘हॅलो’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी मी सलमान खानची एक मुलाखत घेतली होती. त्यावेळी त्याला विचारले होते की, तो जिथे जाईल तिथे गर्दी असते, लोक फोटो काढण्यासाठी गर्दी करतात, त्यावेळी मनात काय भावना असतात. त्यावेळी सलमान खान म्हणाला होता की मला प्राणिसंग्रहालयातील माकडासारखे वाटते. पण, मला माहीत आहे की, मी चाहत्यांशिवाय शून्य आहे. सलमान खानचे हे वाक्य माझ्या कायम लक्षात आहे. मी जेव्हा विमानतळावर जातो आणि चाहते गर्दी करतात, तेव्हा मला कधी कधी त्रास होतो. चिडचिड होते. पण त्यावेळी मला सलमान खानचे हे वाक्य आठवते की, “ज्या दिवशी हे सगळं गेलं, त्या दिवशी सगळं संपलं”, गर्दी पाहून सलमान खानला प्राणीसंग्रहालयातील माकड असल्यासारखे वाटायचे, मात्र चाहत्यांविषयी अभिनेत्याला आदर होता, असे चेतन भगतने म्हटले.

‘किक’ आणि ‘हॅलो’ या चित्रपटांबरोबर चेतन भगतने लेखक म्हणून ‘२ स्टेट’, ‘३ इडियट्स’ व ‘काय पो चे’ अशा चित्रपटांत काम केले आहे. सलमान खान सध्या सिकंदर या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.