Santosh Juvekar Akshaye Khanna : छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटात मराठी अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी ही भूमिका केली आहे. सिनेमाच्या सेटवर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाशी न बोलल्याचं वक्तव्य संतोषने केलं होतं. त्यावरून त्याला ट्रोल केलं जात होतं. या ट्रोलिंगनंतर संतोषने याबद्दल त्याचं मत व्यक्त केलं आहे.
“अक्षय खन्ना माझाही आवडता अभिनेता आहे. आता ट्रोलिंगमुळे बोलत नाहीये, नाहीतर म्हणतील की आता सारवासारव करायला आला. लोक अर्धवट ऐकतात, पूर्ण ऐकत नाहीत. किंवा मला जे बोलायचं होतं ते चुकीच्या पद्धतीने पोहोचलं. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका केली आहे. तो मुलाखती देत नाही, सोशल मीडियावर येत नाही, तो प्रमोशनला येत नाही हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तो करतो म्हणून मी करायचं नाही का? किंवा मी जे करतो ते त्याने करायचं का? असं काहीच नाही. तो मोठा अभिनेता आहे, त्याला गरज नाही. आम्ही स्ट्रगलर्स आहोत, आम्हाला गरज आहे,” असं संतोषने नमूद केलं.
संतोष जुवेकर पुढे म्हणाला, “‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ अरे मी बोलणार. मी जर त्या स्क्रीनवरून डोकावून गेलो असतो तरी मी बोललो असतो. कारण छावामध्ये काम करणं, त्या चित्रपटाचा एक भाग असणं माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. माझं नशीब आहे, फार लोकांना नाही मिळत अशी संधी. ज्यांना मिळालं त्यापैकी एक मी आहे.”
अक्षय खन्ना वाईट आहे असं नाही – संतोष जुवेकर
“माझी आस्था, माझी निस्सीम भक्ती आहे महाराजांवर. पुस्तक वाचल्यानंतर जो इतिहास मला कळला, त्याचा प्रभाव माझ्यावर आहे. त्यामुळे तो थोडासा राग येणं साहजिक आहे. कोणाला राग येणार नाही? प्रत्येकाला येणार. मला ट्रोल करणाऱ्यांपैकी एखादा जरी तिथे असताना त्यानेही तेच केलं असतं याची मला खात्री आहे. पण याचा अर्थ अक्षय खन्ना वाईट आहे असा होत नाही. सेटवर आमच्या असोसिएटिव्हने विचारलं होतं की अक्षय खन्नाला भेटायचंय का? मी भेटायला गेलो होतो पण त्याला त्या गेटअपमध्ये पाहून मग मी म्हणालो की मला नाही भेटायचं. मी वेगळ्या अॅटिट्यूडमध्ये बोललो नव्हतो. मी आतमध्ये गेलो आणि मग नाही म्हणालो, कारण मला बघवत नव्हतं,” असं संतोष जुवेकर म्हणाला.
विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पाहून भारावलो होतो, असं संतोष जुवेकरने सांगितलं.
संतोष जुवेकर काय म्हणाला होता?
“छावा सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत त्या कोणाशीच मी बोललो नाही. शूटिंग सुरु असताना मी तरी त्यांच्याशी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचे शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो, बोललो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंपण नाही. माझा काही अक्षय खन्नावर राग नाही. त्याने उत्तमच काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसंच मला वाटलं नाही,” असं एका मुलाखतीत संतोषने म्हटलं होतं.