बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल लवकरच त्याच्या आगामी ऐतिहासिक ‘छावा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कामात व्यग्र आहे. प्रमोशननिमित्त तो अनेक माध्यमांना मुलाखती देत आहे. अशात एका मुलाखतीमध्ये विक्कीने त्याच्या आणि कतरिना कैफच्या लव्ह स्टोरीबद्दलची खास आठवण सांगितली आहे.
बॉलीवूडमधील कलाकार आणि त्यांच्या प्रेमकहाण्या जास्त काळ लपून राहत नाहीत. मात्र, विकी आणि कतरिना या दोघांनी त्यांच्या नात्याची कुणाला कल्पनादेखील येऊ दिली नाही. २०२१ मध्ये थेट पती-पत्नी म्हणून एकमेकांचा स्वीकार केल्यावर त्यांनी त्यांचं नातं जाहीर केलं. त्यावेळी चाहत्यांना फार मोठा सुखद धक्का बसला होता. अशात या दोघांच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मात्र, दोघांची लव्ह स्टोरी ही अद्यापही एक मोठं रहस्य आहे.
विक्की कौशलनं नुकतीच ‘छावा’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने कतरिना त्याला पहिल्यांदा केव्हा, कशी व कुठे भेटली होती त्याची आठवण सांगितली आहे. विक्की कौशल आणि कार्तिक आर्यन एका कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होते. त्यावेळी तेथे मंचावर कतरिना कैफबरोबर त्याने तिच्या अनेक गाण्यांवर डान्स केला होता. मुलाखतीत त्या वेळची आठवण सांगताना विक्की म्हणाला, “इथे पहिल्यांदाच मी तिला भेटलो आणि माझी तिच्याशी ओळख झाली.”
“तसं तर या कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना कानाला एक मशीन आणि माईक लावलेला असतो. त्यातून सतत काय करायचे आहे, काय नाही याच्या सूचना दिल्या जातात. त्या सर्व सूचना माझ्या कानावर येत होत्या आणि त्याच वेळी माझी तिच्याशी पहिल्यांदाच ओळख झाली होती.” त्यावेळी तू थोडा चिंतेत होतास का, असा प्रश्न विक्कीला मुलाखतीत पुढे विचारण्यात आला. त्यावर त्यानं पटकन नाही, असं उत्तर दिलं.
“मी चिंतेत नव्हतो; पण खरं सांगायचं तर तेव्हा ती मला ओळखत आहे की नाही हे मला माहीत नव्हतं. पण, खरंच ती खूप गोड दिसत होती”, असं विक्कीनं या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. विक्की आणि कतरिना कैफ या दोघांच्या लव्ह स्टोरीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता विक्कीनं सांगितलेला त्यांच्या पहिल्या भेटीचा हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विक्की व कतरिना यांच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, सध्या विक्कीच्या आगामी ‘छावा’ चित्रपटाची सर्वत्र चर्चा होत आहे. तर, लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला चित्रपटगृहांत प्रदर्शित होत आहे. त्यामध्ये विक्कीबरोबर रश्मिका मंदाना मुख्य भूमिका साकारत आहे. तर, कतरिना कैफच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती शेवटची ‘मेरी ख्रिसमस’ या तमीळ चित्रपटात दिसली होती. त्याआधी बॉलीवूडच्या ‘टायगर ३’मध्ये कतरिनाचा अभिनय पाहायला मिळाला.