१४ फेब्रुवारी २०२५ ला प्रदर्शित झालेल्या ‘छावा'(Chhaava) चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटाचे सगळीकडे कौतुक होत आहे. अनेक मोठमोठ्या कलाकार, दिग्दर्शकांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. संपूर्ण देशभरात या चित्रपटाची भुरळ पडल्याचे दिसत आहे, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या चित्रपटाने ४०० कोटींचा कमाईचा आकडा पार करत एक नवीन विक्रम केला आहे. विशेष बाब म्हणजे २०२५ मधील असा हा पहिला चित्रपट आहे, ज्याने ४०० कोटी कमाई केली आहे. चला जाणून घेऊयात ‘छावा’ चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर १५ व्या दिवशी किती कमाई केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने १५ व्या दिवशी उत्तम कमाई केली आहे. ११ व्या दिवशी ‘छावा’ चित्रपटाने १८ कोटींची कमाई केली होती तर १२ व्या दिवशी मंगळवारी १८.५ कोटींची कमाई केली होती. महाशिवरात्रीच्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. १३ व्या दिवशी या चित्रपटाने २३ कोटींची कमाई केली. त्यानंतर मात्र छावाच्या कमाईत घट झाल्याचे पाहायला मिळाले. १४ व्या दिवशी छावाने बॉक्स ऑफिसवर १३.२५ कोटींची कमाई केली. आता सॅल्कनिकच्या रिपोर्टनुसार छावा चित्रपटाने १५ व्या दिवशी १३.४२ कोटींची कमाई केली आहे. या कमाईसह या चित्रपटाने ४०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश मिळवला आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन ४१२.५० कोटी इतके झाले आहे.

आता चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पूर्ण करू शकणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. इतर सिनेमे प्रदर्शित होणार नसल्याने त्याचा फायदा छावाला होऊ शकतो. याबरोबरच ज्या पद्धतीने छावाचे कौतुक होत आहे, त्यामुळे पुढच्या आठवड्यात छावा चित्रपट ५०० कोटींची कमाई करू शकत असल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने २१९.२५ कोटींची कमाई केली होती. आठव्या दिवशी २३.५ कोटींची कमाई केली होती. नवव्या दिवशी या चित्रपटाने ४४ कोटींची कमाई केली आहे. दहाव्या दिवशी या चित्रपटाने ४० कोटी कमावले होते. आता हा चित्रपट किती कमाई करणार आणि कोणते नवीन विक्रम तयार करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विकी कौशलने या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. लक्ष्मण उतेकर यांनी छावा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.