Chhaava Box Office Collection Day 2 Updates : ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे अधिराज्य गाजवलेलं आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘छावा’ सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पहाटेचे शो देखील हाऊसफुल्ल झाले आहेत. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल विकीने देखील पोस्ट शेअर करत कृतज्ञता व्यक्त केली आहे. आता या सिनेमाने पहिल्या दोन दिवसांत म्हणजेच १४ आणि १५ फेब्रुवारीला किती कमाई केली जाणून घेऊयात…
‘छावा’ सिनेमाने पहिल्याच दिवशी ३३.१ कोटींची कमाई केल्याची अधिकृत माहिती ‘मॅडडॉक फिल्म्स’ने पोस्ट शेअर करत दिली आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’ला या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. लोकांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन व्हॅलेंटाईन डे ऐवजी यंदा ‘छावा दिवस’ साजरा केल्याचं पाहायला मिळालं. यामुळे १४ फेब्रुवारीला सर्वाधिक कमाई करणारा ‘छावा’ हा पहिला सिनेमा ठरला आहे. यापूर्वी रणवीर-आलियाच्या ‘गल्ली बॉय’ने व्हॅलेंटाइन्सला १९.४० कोटी कमावले होते. हा रेकॉर्ड ‘छावा’ने मोडला आहे.
शनिवारी सिनेमाला आणखी प्रतिसाद मिळणार याचा अंदाज आधीच चित्रपट समीक्षकांनी व्यक्त केला होता. शनिवारी ‘छावा’ने तब्बल ३९.३ कोटी कमावले आहेत. यामुळे सिनेमाचं एकूण कलेक्शन ७२.४ कोटींच्या घरात गेलं आहे. त्यामुळे लवकरच ‘छावा’ १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल.
विकीसाठी ‘छावा’ हा त्याच्या आजवरच्या सिनेमांपैकी सर्वात मोठी ओपनिंग करणारा सिनेमा ठरला आहे. यापूर्वी त्याच्या ‘उरी’ सिनेमाने अशाप्रकारे दमदार कमाई केली होती. तसेच ‘छावा’ चित्रपटाने अक्षय कुमारच्या ‘स्काय फोर्स’ला देखील मागे टाकलं आहे, ‘स्काय फोर्स’ने गेल्या महिन्यात पहिल्या दिवशी १५.३० कोटी रुपये कमावले होते. आता ‘छावा’ने हा रेकॉर्ड सुद्धा मोडला आहे.

दरम्यान, ‘छावा’बद्दल सांगायचं झालं तर, विकीने सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, रश्मिका मंदाना यामध्ये महाराणी येसूबाईंची भूमिका साकारत आहे. याशिवाय अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, विनीत सिंह अशी तगडी स्टारकास्ट आपल्याला सिनेमात पाहायला मिळत आहे.