Chhaava Box Office Collection Day 20: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. ‘छावा’ने जगभरात ६०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित या ऐतिहासिक चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट व्हॅलेंटाइन डे म्हणजेच १४ फेब्रुवारीला जगभरात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता २० दिवस झाले आहे. २० व्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.
इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या बुधवारी म्हणजेच २० व्या दिवशी, ‘छावा’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर ६.२४ कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे भारतातील २० दिवसांची एकूण कमाई ४७८.१४ कोटी रुपये झाली आहे. पहिल्या आठवड्यात ‘छावा’ने २१९.२५ कोटी रुपये कमावले होते, तर दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. या आठवड्यातील आतापर्यंतची आकडेवारी पाहता चित्रपट ८० कोटी रुपयांची कमाई करण्याची शक्यता आहे.
‘छावा’चे जगभरातील कलेक्शन किती?
‘छावा’ सिनेमा मागील २० दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहे. मॅडॉक फिल्म्सची निर्मिती असलेल्या या ऐतिहासिक चित्रपटाने जगभरात ६४१.७० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. यापैकी ७८ कोटी परदेशात कमावले, तर ५६३.७० कोटी भारतात कमावले. चित्रपटाला मिळणारं यश पाहता निर्मात्यांनी तो तेलुगूमध्येही रिलीज केला आहे.
५ मार्चला मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी आमदारांसाठी ‘छावा’चे विशेष स्क्रीनिंग ठेवले होते. स्क्रीनिंगसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित होते.
दरम्यान, ‘छावा’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी १३० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. चित्रपटाने फक्त तीन दिवसांत बजेटची रक्कम वसूल केली. चित्रपटाला फक्त भारतातच नव्हे तर जगभरात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गोवा व मध्य प्रदेशमध्ये हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे.
‘छावा’मधील कलाकारांबद्दल बोलायचं झाल्यास यात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे. महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना व औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. कवी कलश हे पात्र विनीत कुमार सिंहने साकारले आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, निलकांती पाटेकर, सुव्रत जोशी, सारंग साठ्येसह अनेक मराठी कलाकार या चित्रपटात आहेत.