Chhaava Box Office Collection Day 24 : छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्य गाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन २४ दिवस झाले आहेत. या चित्रपटाने २४ दिवसांत कमाईचे अनेक नवनवे विक्रम रचले आहेत. विशेष म्हणजे चौथ्या रविवारी या चित्रपटाने १० कोटींहून जास्त कलेक्शन केले आहे. चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’मध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी लढलेल्या लढाया, औरंगजेबाने त्यांना दिलेल्या यातना हे सगळं या सिनेमात दाखवण्यात आलं आहे. तब्बल ४ वर्षांची मेहनत आणि १३० कोटी रुपये खर्च करून या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. हा ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि २४ दिवसांत चित्रपटाने भारतात ५०० कोटींहून जास्त व्यवसाय केला आहे.

‘छावा’चे ३ आठवड्यांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘छावा’ने पहिल्या आठवड्यात भारतात २२५.२८ कोटी रुपयांची कमाई केली. तर दुसऱ्या आठवड्यात १८६.१८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तिसऱ्या आठवड्यात ‘छावा’ने ८४.९४ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. तीन आठवड्यात या चित्रपटाने भारतात ५०२ कोटींचा व्यवसाय केला.

‘छावा’ची २४ व्या दिवसाची कमाई

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याच्या दिवशी ‘छावा’ने दमदार कमाई केली आहे. २४ व्या दिवशी या चित्रपटाने ११.५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे, अशी माहिती सॅकनिल्कने दिली आहे. २४ दिवसांची ‘छावा’ची कमाई जवळपास ५३० कोटी रुपये झाली आहे.

‘छावा’बद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटात बॉलीवूड कलाकारांबरोबरच अनेक मराठी कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलने, तर महाराणी येसूबाईंची भूमिका रश्मिका मंदानाने केली आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना आहे. रायाजी ही भूमिका संतोष जुवेकरने साकारली आहे. या चित्रपटात विनीत कुमार सिंह, निलकांती पाटेकर, डाएना पेंटी, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये या कलाकारांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.

‘छावा’ हा यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ठरला आहे. तसेच विकी कौशलच्या करिअरमधील सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट आहे. तिसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत ‘छावा’ दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर पहिल्या क्रमांकावर पुष्पा २ आहे.

Story img Loader