Chhaava box office collection day 27: विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन २७ दिवस झाले आहे. ‘छावा’च्या कलेक्शनचा वेग आता बॉक्स ऑफिसवर मंदावला आहे. पण चित्रपट अजूनही थिएटरमध्ये चालतोय. तब्बल २७ दिवसानंतरही या चित्रपटाला प्रेक्षकांचं प्रेम मिळतंय आणि चित्रपट रिलीजच्या चौथ्या आठवड्यात प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यात यशस्वी झाला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण होत असली तरी अजूनही कमाई मात्र कोटींमध्येच आहे.

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट होत आहे. बुधवारी, त्यात आणखी पाच टक्क्यांची घसरण दिसून आली. चित्रपटाने बुधवारी बॉक्स ऑफिसवर ४.७५ कोटी रुपयांची कमाई केली, अशी माहिती सॅकनिल्कने दिली आहे. १४ फेब्रुवारीला रिलीज झाल्यापासून पहिल्यांदाच चित्रपटाचे एका दिवसाचे कलेक्शन ५ कोटी रुपयांच्या खाली गेले आहे.

‘छावा’चे देशातील एकूण कलेक्शन आता ५३५.५५ कोटींवर पोहोचले आहे. यापैकी हिंदी भाषेत ५२४.४५ कोटी आणि तेलुगू भाषेत ११.१ कोटी रुपयांची कमाई ‘छावा’ने केली आहे.

‘छावा’चे जगभरातील कलेक्शन किती?

रिपोर्ट्सनुसार, छावाचे जगभरातील कलेक्शन ७२७.२५ कोटी रुपये झाले आहे. विकीच्या चित्रपटाने ‘गदर’ २ (६८६ कोटी), ‘सुल्तान’ (६०८.८४ कोटी), आणि ‘संजू’सारख्या (४३८ कोटी) हिट चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. ‘छावा’ रणबीर कपूरच्या ब्लॉकबस्टर ‘ॲनिमल’ला मागे टाकण्यापासून फक्त १८ कोटी रुपये दूर आहे. तर, सिनेमाने अजून ६३ कोटींची कमाई केल्यास तो श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ला मागे टाकू शकतो.

‘छावा’चे ४ आठवड्यांचे कलेक्शन

पहिल्या आठवड्यात ‘छावा’ने २१९.२५ कोटी रुपये कमावले. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी रुपये आणि तिसऱ्या आठवड्यात ८४.०५ कोटी रुपये कमावले. चौथ्या आठवड्यात या चित्रपटाच्या शनिवारच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ झाली आणि चित्रपटाने तब्बल १६.७५ कोटी रुपयांचे कलेक्शन केले. त्यानंतर या चित्रपटाच्या कमाईत सातत्याने घट होत आहे. रविवारी चित्रपटाने १०.७५ कोटी रुपये, सोमवारी ६ कोटी आणि मंगळवारी ५ कोटींची कमाई केली. तर बुधवारचे कलेक्शन ५ कोटींच्या कमी होते. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट होत असतानाच आता होळीची सुट्टी आहे, त्यामुळे ‘छावा’च्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे.

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, ‘छावामध्ये’ विकी कौशलबरोबरच रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंह, आशुतोष राणा, निलकांती पाटेकर, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, डाएना पेंटी आणि दिव्या दत्ता यांच्याही भूमिका आहेत.