Chhaava Box Office Collection Day 32: ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्यांहून जास्त दिवस झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारा हा चित्रपट ३२ दिवसांपासून बॉक्स ऑफिस गाजवत आहे. विकी कौशल दिग्दर्शित या चित्रपटात विकी कौशलने मुख्य भूमिका साकारली आहे. ‘छावा’ने शाहरुख खानच्या ‘पठाण’ (२०२३) आणि रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’चे रेकॉर्ड मोडले आहेत.
‘छावा’ आता लवकरच श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री 2’ ने केलेल्या कमाईला मागे टाकण्याची शक्यता आहे. अमर कौशिकच्या हॉरर-कॉमेडीला मागे टाकण्यापासून ‘छावा’ फक्त काही कोटी दूर आहे. ‘छावा’च्या कमाई सातत्याने घट होत आहे, त्यामुळे तो ‘स्त्री 2’ चा रेकॉर्ड मोडेल की नाही याबद्दल शंका आहे.
‘छावा’ने पाचव्या सोमवारी ‘इमर्जन्सी’पेक्षा जास्त कलेक्शन केले
‘छावा’ने पाचव्या सोमवारी चित्रपटगृहांमध्ये कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या ओपनिंगपेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. ‘इमर्जन्सी’ने पहिल्या दिवशी अडीच कोटी रुपये कमावले होते. तर ‘छावा’ने ३२ व्या दिवशी २.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे; अशी आकडेवारी इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिली आहे.
‘छावा’ने रविवारी ८ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्या तुलनेत सोमवारी ६६.८८ टक्क्यांची घट झाली. हिंदी भाषेतील ‘छावा’ने सोमवारी एकूण २.३५ कोटी रुपयांची कमाई केली, तर तेलुगू भाषेतील ‘छावा’ने ३० लाख रुपयांचे कलेक्शन केले. ‘छावा’ची देशभरातील कमाई ५६५.३ कोटी रुपये झाली आहे. सध्या हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आठव्या स्थानावर आहे. ३२ दिवसांनंतर ‘छावा’ची जगभरातील कमाई ७६०.७५ कोटी रुपये झाली आहे.
स्त्री 2 ने जगभरात ८५७ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर भारतात ५९७.९९ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होते. ‘छावा’ला स्त्री 2 चा रेकॉर्ड मोडण्यासाठी ३२.६९ कोटी रुपयांचे कलेक्शन करावे लागेल. ‘छावा’च्या कमाईत होणारी घसरण पाहता तो राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर कॉमेडी चित्रपटाला मागे टाकेल की नाही हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
‘छावा’ने देशात चांगली कमाई केली आहे, त्या तुलनेत परदेशातील कमाई कमी आहे. ‘छावा’ने परदेशातून ९० कोटी रुपये कमावले. तर स्त्री 2 ची परदेशातील कलेक्शन १४४ कोटी रुपये होते.
दरम्यान, ‘छावा’चे बजेट १३० कोटी रुपये आहे. तब्बल ४ वर्षे लक्ष्मण उतेकर व त्यांच्या टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली. या चित्रपटात रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, विनीत कुमार सिंह, निलकांती पाटेकर, दिव्या दत्ता, डाएना पेंटी, संतोष जुवेकर या कलाकारांनी काम केलं आहे.