Chhaava Box Office Collection Day 4 : छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित विकी कौशलने मुख्य भूमिका साकारलेला ‘छावा’ चित्रपट रिलीज होऊन चार दिवस झाले आहेत. चार दिवसांत ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमगिरी केली आहे. हा ऐतिहासिक चित्रपट पाहून प्रेक्षक भारावले आहेत. अनेकजण पुन्हा पुन्हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरला जात आहेत.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची फक्त भारतातच नव्हे तर जगभरात क्रेझ आहे, हे या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांवरून दिसून येत आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने भारतात १२० कोटींहून जास्त कमाई केली, तर जगभरात १६० कोटींहून जास्त कमाई केली. आता चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.
‘छावा’ने चौथ्या दिवशी किती कलेक्शन केले?
‘छावा’ने सुरुवातीचे तीन दिवस जबरदस्त कलेक्शन केले. ‘छावा’ सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी, भारतात ३३.१ कोटी रुपये कमावले. दुसऱ्या दिवशी ‘छावा’ने तब्बल ३९.३ कोटी रुपये कमावले आणि तिसऱ्या दिवशी ‘छावा’ने ४९.३ कोटी रुपयांचे कलेक्शन केले होता. चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी चित्रपटाच्या कमाईत घट झाली आहे. तिसऱ्या दिवसाच्या तुलनेत चौथ्या दिवशी सिनेमाने निम्मे कलेक्शन केले. चित्रपटाने सोमवारी २४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन १४५ कोटींवर पोहोचले आहे.
‘छावा’ चित्रपटातील कलाकार
‘छावा’ चित्रपटात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाचे पात्र साकारले आहे. या चित्रपटात विनित सिंह, आशुतोष राणा, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी, रोहित पाठक या कलाकारांनी विविध भूमिका साकारल्या आहेत.

‘छावा’ चित्रपटाने ४ दिवसांत बजेट वसूल केले आहे. चित्रपटाचे बजेट १३० कोटी आहे. चित्रपटाची कमाई १४५ कोटींहून जास्त झाली आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास ते १६५ कोटींहून जास्त आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणाऱ्या ‘छावा’ सिनेमाची सध्या सगळीकडे खूप चर्चा आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत, ते पाहता येत्या काही दिवसांत चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होईल, असं दिसत आहे.