Chhaava box office collection day 40: विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन सहा आठवडे झाले आहेत. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
या आठवड्यात सलमान खान व रश्मिका मंदानाचा ‘सिकंदर’ रिलीज होणार आहे. त्याआधीच ‘छावा’च्या कमाईत घट झाली आहे. ४० व्या दिवशी म्हणजेच सहाव्या मंगळवारी चित्रपटाने दीड कोटींची कमाई केली आहे. सोमवारच्या तुलनेत कमाईत जवळपास ६५.५९ टक्के घट झाली आहे. छावाचे भारतातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन ५८६.३५ कोटी रुपये झाले आहे. या सिनेमाच्या निर्मितासाठी १३० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
‘छावा’ चित्रपट हिंदीत रिलीज झाल्यानंतर काही दिवसांनी तेलुगू भाषेतही रिलीज करण्यात आला होता. आता हिंदीबरोबरच तेलुगू भाषेतील ‘छावा’च्या कमाईत घसरण झाली आहे. सोमवारी या चित्रपटाने एक लाख रुपये कमावले. जगभरात ‘छावा’चे कलेक्शन ७८७.५ कोटी रुपये झाले आहे. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम मोडले आहेत. रणबीर कपूर, रश्मिका मंदानाच्या ‘ॲनिमल’सह अनेक हिंदी ब्लॉकबस्टर चित्रपटांना ‘छावा’ने मागे टाकलं आहे. आता रश्मिकाचाच ‘सिकंदर’ रिलीज झाल्यावर ‘छावा’ त्याला टक्कर देऊ शकेल की नाही ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
‘छावा’तील कलाकार
‘छावा’मध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे. तर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना असून अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. निलकांती पाटेकर, संतोष जुवेकर, सारंग साठ्ये, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी हे मराठी कलाकार विविध भूमिकेत आहेत. आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह यांनीही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट फक्त कमाईमुळेच चर्चेत राहिला नाही, तर त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा पुन्हा समोर आला आणि राज्यातील वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं.