Chhaava box office collection Day 8: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित हा ऐतिहासिक चित्रपट सातत्याने दमदार कमाई करत आहे. खरं तर एका हिंदी चित्रपटाने रिलीजनंतर एक आठवडा रोज २० कोटींपेक्षा जास्त कमाई करणं ही मोठी गोष्ट आहे आणि ‘छावा’ने ही कामगिरी केली आहे.
‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. रिलीजला एक आठवडा उलटला असला तरी प्रेक्षकांचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. या चित्रपटाने शुक्रवारी म्हणजेच आठवड्या दिवशी किती कमाई केली, त्याची आकडेवारी समोर आली आहे. या चित्रपटाने जगभरातही दमदार कलेक्शन केले आहेत. पाहुयात ‘छावा’ने आतापर्यंत किती कमाई केली.
चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई किती?
‘छावा’ने पहिल्या दिवसाची कमाई – ३३.१ कोटी
‘छावा’ दुसऱ्या दिवसाची कमाई – ३९.३ कोटी
‘छावा’ तिसऱ्या दिवसाची कमाई – ४९.०३ कोटी
‘छावा’ चौथ्या दिवसाची कमाई – २४.१ कोटी
‘छावा’ पाचव्या दिवसाची कमाई – २५.७५ कोटी
‘छावा’ सहाव्या दिवसाची कमाई – ३२.४ कोटी
‘छावा’ सातव्या दिवसाची कमाई – २२ कोटी
शुक्रवारी, रिलीजच्या आठव्या दिवशी ‘छावा’ने सुमारे २३ कोटींची कमाई केली. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते, ‘छावा’चे भारतातील एकूण कलेक्शन २४२.२५ कोटी रुपये झाले आहे. जागतिक स्तरावर या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास ३५० कोटींची कमाई केली आहे. चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा सांगणारा हा चित्रपट प्रेक्षकांना फारच भावला आहे. पंतप्रधान मोदींनीही त्यांच्या भाषणात या चित्रपटाचं कौतुक केलं. तर मध्य प्रदेश आणि गोवा या राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री केला आहे.
१३० कोटींचे बजेट असलेल्या ‘छावा’ चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे. रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे, तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत आहे. संतोष जुवेकरने रायाजी हे पात्र साकारले आहे, तर विनित सिंह कवी कलश या भूमिकेत आहे. सुव्रत जोशी, निलकांती पाटेकर, शुभांकर एकबोटे, आशुतोष राणा, सारंग साठ्ये, दिव्या दत्ता, नील भूपालम, प्रदीप राम सिंह रावत, डाएना पेंटी हे कलाकारही या चित्रपटात आहेत.