Chhaava Movie : छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये विकी कौशल व दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून शिवप्रेमींमध्ये ‘छावा’बद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत विकी आणि लक्ष्मण उतेकरांना सेटवरच्या भावनिक प्रसंगाबद्दल विचारण्यात आलं. यावर या दोघांनी राज्याभिषेक सोहळ्याच्या शूटिंगदरम्यानचा भावुक प्रसंग सांगितला आहे.
‘छावा’ दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले, “आम्ही रायगडाचा सेट फिल्मसिटीला तयार केला होता. यासाठी आमचे प्रोडक्शन डिझायनर जे आहेत त्यांनी प्रत्यक्षात रायगडावर जाऊन, रिसर्च करून तो सेट तयार केला होता. त्या काळात महाराजांचा दरबार जसा असेल, अगदी जसाच्या तसा तो दरबार उभारला होता. त्या शूटिंगला सेटवर ७०० ते ८०० लोक उपस्थित होते आणि राजे सिंहासनावर जाऊन बसतात असा सीन आम्ही शूट करू लागलो. आम्ही सेटवर कोणताच शॉट दोन ते तीन टेकच्या पुढे घेतला नव्हता. आमच्या दोघांमध्ये ( विकी व दिग्दर्शक ) खूपच चांगलं इक्वेशन आहे, त्यामुळे अनेकदा आम्ही डोळ्यांनीच बोलतो. पण, त्या सीनसाठी आम्हाला १५ टेक लागले. सिंहासनाला पाहून ज्या मार्कवर उभं राहायचं होतं, तिथे उभं राहून त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते.”
“राजा प्रजेसमोर रडू शकत नाही म्हणून, मी सांगत होतो मला अश्रू नको आहेत. शेवटी मग विकीने जवळ येऊन मला मिठी मारली, तो ढसाढसा रडला. सर, माहिती नाही पण, माझे अश्रू थांबत नाही असं त्याने सांगितलं. मग आम्हाला समजलं… तो तोच दिवस होता ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. त्या दिवशी सेटवरच्या दरबारात असणारे ७०० ज्युनियर्स, इतर अभिनेते, क्रू मेंबर्स प्रत्येकजण रडत होता. मी, विकी, रश्मिका आम्ही सगळे सेटवर रडत होतो. तो क्षण आम्हा सर्वांसाठी खूप जास्त भावनिक होता.” असं लक्ष्मण उतेकर यांनी सांगितलं.
यावर विकी म्हणाला, “सिनेमाचा शेवट शूट करताना आम्हाला वाईट वाटेल हे आम्हाला माहितीच होतं. कारण, तो क्षणच तसा आहे. पण, राज्याभिषेक सोहळ्याचा सीन शूट करताना आम्ही इतके भावनिक होऊ याचा आम्ही कोणीच विचार केला नव्हता.”
© IE Online Media Services (P) Ltd