छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. विकी कौशलने या सिनेमासाठी गेली काही वर्षे प्रचंड मेहनत घेतली आहे. ‘छावा’ सिनेमासाठी अभिनेता जवळपास ७-८ महिने तलवारबाजी आणि घोडेस्वारी शिकला. यानंतर सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि विकी कौशल यांनी नुकतीच बॉलीवूड हंगामाला मुलाखत दिली. यावेळी या दोघांनी क्लायमॅक्सच्या सीनबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराजांच्या अंतिम काळात औरंगजेबाने त्यांचा खूप छळ केला होता. हे दृश्य शूट करताना विकीच्या हाताला खरोखरच दुखापत झाली होती. याबद्दल सांगताना लक्ष्मण उतेकर म्हणतात, “संपूर्ण रात्र, विकीचे हात साखळदंडाने बांधलेले होते आणि जेव्हा आम्ही दोरी काढली तेव्हा त्याचे हात खालीच येत नव्हते. त्याचे हात सुन्न पडले होते. यानंतर आम्हाला शूटिंगसाठी दीड महिन्यांचा ब्रेक घ्यावा लागला होता.”

लक्ष्मण उतेकर पुढे म्हणाले, “आम्ही क्लायमॅक्सच्या सीनसाठी संपूर्ण सेट बनवलेला तो काढून बरखास्त केला. विकीला बरं होण्यासाठी साधारण दीड महिन्यांचा कालावधी दिला. मग, पुन्हा सेट बांधला आणि नंतर पुन्हा एकदा शूट सुरू झालं.”

“ज्यावेळी आम्ही नव्याने शूटिंगला सुरुवात केली तेव्हा ऐतिहासिक नोंदीनुसार तो दिवस सारखाच होता. म्हणजेच, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा छळ केला तो दिवस आणि शूटिंगची तारीख हे दिवस सारखेच होते. योगायोगाने त्याच दिवशी आम्ही चित्रीकरण करत होतो. त्यामुळे त्या दिवशी मनात अनेक भावना दाटून आल्या होत्या.” असं लक्ष्मण उतेकरांनी सांगितलं.

दरम्यान, बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रेक्षकांना महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत झळकणार आहे. औरंगजेबाची भूमिका अभिनेता अक्षय खन्ना ‘छावा’मध्ये साकारणार आहे. याशिवाय आशुतोष राणा, दिव्या दत्ता, डायना पेन्टी, प्रदीप राम सिंह रावत, विनीत कुमार सिंह, संतोष जुवेकर, आशिष पाथोडे, किरण करमरकर हे कलाकार देखील ‘छावा’मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.