बॉलीवूड अभिनेता विकी कौशल(Vicky Kaushal)व रश्मिका मंदाना यांची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. आता नुकतेच चित्रपटातील पहिले गाणेदेखील प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘जाने तू’ असे या गाण्याचे नाव आहे. हा सोहळा हैद्राबाद येथे पार पडला. या कार्यक्रमात विकी कौशलने प्रेक्षकांशी संवाद साधत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. महत्त्वाचे म्हणजे, त्याने हा संवाद तेलुगु भाषेत साधला आहे. विकीने तेलुगु भाषेत जमलेल्या समुदायाला संबोधित केल्यानंतर चाहते आनंद व्यक्त करताना दिसले.
विकी कौशलच्या ‘त्या’ कृतीने जिंकली चाहत्यांची मने
छावा चित्रपटाच्या कार्यक्रमासाठी विकी कौशलने हैद्राबादमध्ये हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांशी संवाद साधताना, कसे आहात सगळे, हैद्राबादमध्ये येऊन आणि तुम्हाला भेटून आनंद झाला, असे तेलुगु भाषेत म्हटले. यावेळी त्याने रश्मिकाची मदत घेतली. याबरोबरच, जबरदस्तला तेलुगुमध्ये काय म्हणतात, असेही तो विचारताना दिसला. महाराणी येसूबाई व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ‘जाने तू’ हे गाणे आहे. ए. आर. रेहमान यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे. प्रसिद्ध गायक अरिजित सिंहने हे गाणे गायले आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपट सध्या मोठ्या चर्चेत आहे. चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे, तर रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारली आहे. अभिनेता अक्षय खन्नादेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. अक्षय खन्नाने मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपू्र्वी शेअऱ करण्यात आलेल्या कलाकारांच्या लूकने चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली होती. ‘छावा’ चित्रपटाच्या ट्रेलरने मात्र धुमाकूळ घातल्याचे पाहायला मिळाले. प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले आहे. मात्र, छत्रपती संभाजी महाराज यांच्या लेझिम नृत्याचा सीन पाहिल्यानंतर वाद निर्माण झाला होता. अनेकांनी तो सीन काढून टाकण्याची मागणी केली होती. त्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी तो सीन चित्रपटातून काढण्यात येईल, असे म्हटले आहे.
दरम्यान, या चित्रपटात अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी ही भूमिका साकारली आहे. काही दिवसांपू्र्वीच त्याने एका मुलाखतीत चित्रपटातील काही सीन हे अंगावर काटा आणणारे होते, तर काही डोळ्यात पाणी आणणारे होते, असे म्हटले होते. याबरोबरच, विकी कौशलबरोबरचा काम कऱण्याचा अनुभव कसा होता, यावरही अभिनेत्याने भाष्य केले आहे. आता या सिनेमाच्या जबरदस्त ट्रेलरनंतर प्रेक्षकांना चित्रपटही आवडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. १४ फेब्रुवारी २०२५ ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.