लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं खूप कौतुक करण्यात आलं. तसंच ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून अक्षय खन्नाने बॉलीवूडमध्ये जबरदस्त पुनरागमन केलं. या चित्रपटात त्याने औरंगजेबाची भूमिका उत्कृष्टरित्या पेलली. अक्षय खन्नाच्या कामाचं देखील खूप कौतुक करण्यात आलं. आता अक्षय दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. दक्षिणेतल्या एका नव्या चित्रपटात अक्षय खन्ना दमदार भूमिकेत झळकणार असल्याचं समोर आलं आहे.
अक्षय खन्ना लवकरच दक्षिणेतील पौराणिक सुपरहिरो चित्रपट ‘महाकाली’ मध्ये दिसणार आहे. काही वृत्तांनुसार, अक्षयला ‘महाकाली’ चित्रपटासाठी अधिकृतपणे साइन करण्यात आलं आहे. तरण आदर्शने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करून अभिनेत्याच्या कास्टिंगची पुष्टी केली आहे. पण, तो या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार की मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जर या चित्रपटात अक्षय खलनायकाची भूमिका करत असेल तर चाहत्यांना त्याला दक्षिणेतील खलनायकाच्या भूमिकेत पाहणं खूप मजेदार असेल.
माहितीनुसार, ‘महाकाली’ चित्रपटाचे निर्माते अक्षयच्या भूमिकेवर काम करत आहेत. अक्षयची भूमिका खूपच खास असणार आहे आणि प्रशांत वर्मा सिनेमॅटिक युनिव्हर्स ( PVCU ) मध्ये एक मोठा ट्विस्ट आणणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झालेले नाही. पण निर्माते त्याची तयारी करण्यात व्यग्र आहेत. दिग्दर्शिका पूजा अपर्णा कोल्लुरू आणि निर्माते प्रशांत वर्मा सध्या कास्टिंग आणि इतर नियोजनात व्यग्र आहेत.
दरम्यान, पीव्हीसीयूची सुरुवात भगवान हनुमानावर आधारित ‘हनुमान’ या सुपरहिरो चित्रपटाने झाली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता या चित्रपटाचा सिक्वेल ‘जय हनुमान’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे; ज्यामध्ये अभिनेता ऋषभ शेट्टी झळकणार आहे.
निर्माते प्रशांत वर्मा सध्या बहुचर्चित ‘जय हनुमान’ चित्रपटाची तयारी करत आहेत. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. याशिवाय प्रशांत ‘ब्रह्म राक्षस’ या आणखी एका मोठ्या चित्रपटावरही काम करत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं. परंतु काही मतभेदांमुळे रणवीरने या चित्रपटातून माघार घेतली.