Chhaava Movie : बॉलीवूड अभिनेता विकी कौशल सध्या ‘छावा’ चित्रपटामुळे सर्वत्र तुफान चर्चेत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून मराठीसह बॉलीवूड कलाविश्वातून अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. विकीचा अभिनय, महाराजांचा इतिहास, शंभूराजेंची शौर्यगाथा आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी ‘छावा’साठी घेतलेली मेहनत पाहून सगळेजण भारावून गेले आहेत. आज शिवजयंतीच्यानिमित्ताने ‘छावा’ची संपूर्ण टीम रायगडावर पोहोचली होती. याचे फोटो विकी कौशलने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
‘छावा’ सिनेमाच्या निमित्ताने विकी कौशलने गेल्या काही दिवसांत अनेक मुलाखतींना उपस्थिती लावली होती. यावेळी त्याने सिनेमा प्रदर्शित झाल्यावर सर्वात आधी रायगडावर जायचंय असं म्हटलं होतं. अखेर अभिनेत्याने त्याचा हा शब्द पाळलेला आहे. विकी कौशलने १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्ताने किल्ले रायगडाला भेट दिली आहे. याठिकाणी नतमस्तक होत विकीने महाराजांना त्रिवार वंदन केलं आहे.
विकी कौशल यावेळी मराठमोळ्या अंदाजात डोक्यावर फेटा बांधून रायगडावर पोहोचला होता. त्याच्यासह दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर, निर्माते दिनेश विजन ही सगळी मंडळी रायगडावर उपस्थित होती.
विकी कौशल फोटो शेअर करत लिहितो, “आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने मला रायगडावर जाण्याचं सौभाग्य मिळालं. यानिमित्ताने मी पहिल्यांदाच रायगडावर गेलो. महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही. तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा! जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे!”
विकी कौशलने शेअर केलेल्या रायगडावरील फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “जय शिवराय, जय भवानी”, “पहिले आभार उतेकर सरांचे..खरे शिवभक्त आहेत ते… विकी सर, ‘छावा’ चित्रपटासाठी तुमची निवड आणि तुमची कामगिरी खूप छान”, “विकी खरा वाघ शोभलास”, “विकी आता तुळजापूर सुद्धा जाऊन ये”, “सर्व मराठी जनसमुदायाचं मन जिंकलंस” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.

दरम्यान, विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर या चित्रपटाने १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या ५ दिवसांत बॉक्स ऑफिसवर १७१.२८ कोटींचा गल्ला जमावला आहे.