Chhaava Movie First Song : ‘छावा’ सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा सुरू आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना या दोघांच्या ‘छावा’मध्ये प्रमुख भूमिका आहेत. नुकतंच या सिनेमातलं पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात प्रेक्षकांना छत्रपती संभाजी महाराजाच्या जीवनातील विविध टप्पे पाहायला मिळतात. राज्याभिषेक सोहळ्यापासून ते औरंगजेबाच्या कैदेत महाराजांनी कसा लढा दिला याचे विविध प्रसंग गाण्यात दाखवण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘छावा’ सिनेमातलं ‘जाने तू’ हे भावनिक गाणं ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलं असून अरिजित सिंहने या गाण्यासाठी पार्श्वगायन केलं आहे. गाण्याच्या सुरुवातीलाच महाराणी येसूबाई महाराजांचं औक्षण करत असल्याचं पाहायला मिळतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी, श्री सखी राज्ञी जयति महाराणी येसूबाई यांची भूमिका साकारण्यासाठी रश्मिकाने प्रचंड मेहनत घेतली आहे. यासाठी मराठी भाषेचं प्रशिक्षण घेतल्याचंही तिने मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. चेहऱ्यावर प्रसन्न करुन टाकणार स्मितहास्य, कपाळी कुंकू, नाकात नथ, गळ्यात पारंपरिक दागिने, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा असा महाराणींच्या रुपात ऐतिहासिक लूक रश्मिकाचा या गाण्यात पाहायला मिळत आहे.

‘जाने तू’ या गाण्याच्या पहिल्या टप्प्यात राज्याभिषेक सोहळा, हिंदवी स्वराज्य, महाराणी येसूबाईंनी महाराजांना प्रत्येक निर्णयात दिलेली साथ या गोष्टी पाहायला मिळतात. तर, दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच बरोबर २ मिनिटं २० सेकंदानंतर अंगावर काटा येऊन सर्वांचेच डोळे पाणावतात. गाण्यात एकीकडे महाराज औरंगजेबाच्या सैन्याशी लढा देत असल्याचं दृश्य पाहायला मिळतं. तर, दुसरीकडे येसूबाई शंभूराजेंसाठी देवाची प्रार्थना करत असतात. सिंहासनाकडे आस लावून त्या पाहत असतात. हा भावनिक सीन पाहून मन हळहळतं. हे गाणं पाहून सर्वांचेच डोळे पाणावल्याचं कमेंट्स वाचून लक्षात येतं.

“पाहुनी शौर्य तुझपुढे, मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी, माझा शंभू अमर झाला”, “फायनली या गाण्यात हिंदवी स्वराज्य म्हटलं आहे”, “विकीने खरंच सुंदर काम केलंय”, “विकी रश्मिका Nailed it” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी यावर केल्या आहेत.

गाण्यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया ( Chhaava Movie First Song )

दरम्यान, बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे यांसारखे मराठी कलाकार सुद्धा या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. तर, ‘छावा’मध्ये औरंगजेबच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना दिसेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhaava film jane tu first song release starring vicky kaushal and rashmika mandanna sva 00