लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava) हा चित्रपट रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल आहे. तर रश्मिका मंदाना व अक्षय खन्ना यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातील सर्व कलाकारांचं खूप कौतुक होत आहे. विक्की कौशल, त्याचबरोबर औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाने उत्तम काम केलं आहे. या चित्रपटातील आणखी एका पात्राचं खूप कौतक होत आहे. ते म्हणजे कवी कलश. कवी कलश हे छत्रपती संभाजी महाराज यांचे जवळचे मित्र होते. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची निर्घृण हत्या केली होती. ‘छावा’मध्ये कवी कलश हे पात्र विनीत कुमार सिंहने साकारले आहे. विनितने दमदार अभिनय केला असून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘छावा’च्या निमित्ताने विनितच्या करिअरबद्दल जाणून घेऊयात.
‘छावा’मध्ये अभिनेता विनीत कुमार सिंहने कवी कलश ही भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. चित्रपटातील शेवटचा सीन फक्त विक्की कौशल आणि विनीत यांच्यावर चित्रीत करण्यात आला आहे. ‘छावा’मुळे मिळालेली लोकप्रियता ही विनीत कुमारच्या अनेक वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे. विनीत दोन दशकांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहे, पण आता त्याला आतापर्यंत तेवढं यश आणि ओळख मिळाली नाही जी ‘छावा’ने मिळवून दिली. २२ वर्षांच्या करिअरमध्ये विकी कौशलने २५ चित्रपट केले, तो अनेक उत्कृष्ट चित्रपटांचा भाग होता, जे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले आणि विनीतच्या अभिनयाचे कौतुक झाले. पण, ‘छावा’मधून मिळालेले यश आणि ओळख मात्र त्याला आधी मिळू शकली नाही.
‘छावा’च्या यशानंतर विनीत सिंह म्हणाला की चांगलंय, आता कोणी मला माझं नाव विचारणार नाही आणि मला अंडररेटेड अभिनेता म्हणणार नाही. ‘छावा’ विनीत सिंहच्या करिअरमधील टर्निंग पॉइंट ठरला आहे.
डॉक्टर होता विनीत कुमार सिंह
‘छावा’ फेम विनीत कुमार सिंह सीपीएमटी क्वालिफाईड आहे. तो मेडिकल कॉलेजमध्ये टॉपर होता. विनीत मेडिकल प्रॅक्टिशनर आहे. त्याने आर.ए. पोद्दार आयुर्वेद वैद्यकीय मेडिकल कॉलेजमधून आयुर्वेद, मेडिसीन व सर्जरीमध्ये डिग्री घेतली. त्यानंतर नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून आयुर्वेदात एमडी पदवी पूर्ण केली आहे. विनीत फक्त डॉक्टरच नाही तर तो राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल चॅम्पियन देखील आहे. तो मेडिकल फिल्ड सोडून अभिनयक्षेत्रात आला आणि इथे यश मिळवायला त्याला तब्बल २२ वर्षे लागली.

उत्तर प्रदेशचा आहे विनीत कुमार सिंह
विनीत कुमार सिंह मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो मुंबईत ‘सुपरस्टार टॅलेंट हंट’मध्ये सहभागी व्हायला आला होता. याचा विजेता ठरल्यानंतर त्याला महेश मांजरेकर यांनी संजय दत्तच्या ‘पिताह’ चित्रपटात काम दिलं. यानंतर विनीतला कामासाठी खूप संघर्ष करावा लागला. मग विनीतने महेश मांजरेकर यांच्या ‘विरुद्ध’ आणि ‘देह’ या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. २००७ मध्ये दिग्दर्शन सोडून त्याने अभिनयावर लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर त्याला भोजपुरी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्याने ‘गोरी तेरे प्यार में’ आणि ‘इश्क’ सारख्या चित्रपटात काम केलं. त्यानंतर ‘सिटी ऑफ गोल्ड’ या हिंदी-मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. इथून त्याच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. मग त्याला अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटात काम मिळाले. यामध्ये त्याने दानिश खानची भूमिका साकारली होती. यानंतर तो ‘अगली’, ‘बॉम्बे टॉकीज’ सारख्या चित्रपटांमध्ये झळकला.
विनीतच्या करिअरचा टर्निंग पॉइंट
विनीत कुमार सिंहने नंतर ‘बॉलीवूड डायरीज’, ‘मुक्काबाज’, ‘दास देव’, ‘गोल्ड’, ‘आधार’, ‘सांड की आँख’ आणि ‘गुंजन सक्सेना’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ‘मुक्काबाज’ चित्रपट त्याच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटातील त्याच्या दमदार अभिनयाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटात त्याने बॉक्सरची भूमिका साकारली आणि दोन वर्षे बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेतले होते. विनीतने नंतर बार्ड ऑफ ब्लड’, ‘बेताल’ और ‘रंगबाज़: डर की राजनीती’ या तीन वेब सीरिजमध्येही काम केलं.
विनीतने करिअरमध्ये अनेक पुरस्कार पटकावले आहेत. त्याला ‘मुक्काबाज’साठी क्रिटिक्स चॉइस फिल्म अवॉर्ड्स २०१९ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. तसेच त्याला ६४व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये बेस्ट अॅक्टर क्रिटिक्ससाठी नामांकन मिळालं होतं.