Chhaava Movie Advance Booking Collection : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या सिनेमाच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संपूर्ण जगभरात पोहोचणार आहे. यामध्ये महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल साकारत आहे. तर, महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत ‘छावा’मध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकणार आहे. या सिनेमासाठी विकी कौशलने दिवसरात्र मेहनत घेतली आहे. ‘छावा’ सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याआधी निर्मात्यांनी अॅडव्हान्स बुकिंगची घोषणा केली आहे.
‘छावा’च्या अॅडव्हान्स बुकिंगला ९ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. आतापर्यंत किती तिकिटांची विक्री झाली? याबद्दलची अधिकृत अपडेट निर्मात्यांकडून शेअर करण्यात आली आहे. ‘मॅडडॉक फिल्म्स’ने दिलेल्या माहितीनुसार ९ फेब्रुवारीपासून तिकिट विक्री सुरू झाल्यावर आतापर्यंत म्हणजेच एकूण ७२ तासांमध्ये ‘छावा’ सिनेमाची एकूण ३ लाख तिकिटे विकली गेली आहेत. यावरून प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांचा या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे.
याशिवाय ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, या सिनेमाची आतापर्यंत ३ लाख तिकिटं विकली गेली असून, अॅडव्हान्स बुकिंगमध्ये ब्लॉक सीट्सना पकडून ‘छावा’ने आतापर्यंत ७.३ कोटींची कमाई केली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आणखी २ दिवस बाकी आहेत. त्यामुळे आता येत्या काळात अॅडव्हान्स बुकिंगमध्ये किती वाढ होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अॅडव्हान्स बुकिंगची सध्याची वाढत जाणारी आकडेवारी पाहिली असता ‘छावा’ सिनेमाची प्रदर्शनाआधीच किती मोठ्या प्रमाणात क्रेझ निर्माण झालीये आहे हे स्पष्ट होतं.
‘छावा’ सिनेमासाठी देशभरात सर्वाधिक अॅडव्हान्स बुकिंग महाराष्ट्र, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांमध्ये सुरू आहे. निर्मात्यांनी या उदंड प्रतिसादासाठी प्रेक्षकांचे पोस्ट शेअर करत आभार मानले आहेत.
दरम्यान, ‘छावा’मध्ये विकी आणि रश्मिका यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना झळकणार आहे. याशिवाय आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंह, डायना पेन्टी हे कलाकार सुद्धा ‘छावा’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी ए आर रेहमान यांनी सांभाळली आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकार दखील झळकले आहेत.