Chhaava Box Office Collection Day 10 : विकी कौशलच्या ‘छावा’ सिनेमाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा चालू आहे. १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाल्यापासूनच ‘छावा’चे शो सर्वत्र हाऊसफुल सुरू आहेत. यामुळेच अवघ्या दहा दिवसांत या चित्रपटाने भारतातील बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. ‘छावा’मुळे विकी कौशलच्या फिल्मी करिअरला देखील नवीन कलाटणी मिळाली आहे. ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणारा ‘छावा’ हा विकीची प्रमुख भूमिका असलेला पहिला चित्रपट ठरला आहे.
१४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या सात दिवसांमध्ये विकी कौशलच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल २२५.२८ कोटींची कमाई केली. पहिल्या आठवड्यात २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतल्यावर आठव्या दिवशी या सिनेमाने २४.०३ कोटी कमावले. यानंतर नवव्या दिवशी म्हणजे दुसऱ्या शनिवारी ‘छावा’च्या कमाईत मोठी वाढ झाली. नवव्या दिवशी या सिनेमाने तब्बल ४४.१ कोटींची रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली. याशिवाय प्रदर्शित झाल्यापासून दुसऱ्या रविवारी म्हणजेच १० व्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ४१.१ कोटींचा गल्ला जमावल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलं आहे.
यामुळे ‘छावा’ सिनेमाचं एकूण १० दिवसांचं कलेक्शन ३३४.५१ कोटी एवढं झालेलं आहे. अवघ्या दहा दिवसांत सिनेमाने ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची ही यशस्वी घौडदौड पाहता लवकरच या चित्रपटाचा ५०० कोटींच्या यादीत समावेश होईल असा अंदाज चित्रपट समीक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
‘छावा’ सिनेमाचे गेल्या काही दिवसांपासून पुण्यात हाऊसफुल्ल शो सुरू आहेत. दहाव्या दिवशी या सिनेमाने पुणे ( ८५.७५ टक्के ), मुंबई ( ७५.२५ टक्के ), आणि चेन्नई ( ८३.२५ टक्के ) या तीन शहरांमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे.
‘छावा’ सिनेमा बॉक्स ऑफिस कलेक्शन
- पहिला आठवडा ( सात दिवस : १४ फेब्रुवारी – २१ फेब्रुवारी ) – २२५.२८ कोटी
- आठवा दिवस – २४.०३ कोटी
- नववा दिवस – ४४.१० कोटी
- दहावा दिवस – ४१.१ कोटी
- एकूण कलेक्शन – ३३४.५१ कोटी
दरम्यान, ‘छावा’मध्ये विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह, दिव्या दत्ता, डायना पेंटी, प्रदीप रावत, नील भूपालम, संतोष जुवेकर असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.