Chhaava Box Office Collection Day 9 : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ सिनेमा १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने ‘ओपनिंग डे’लाच बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली होती.

सिनेमा प्रदर्शित होऊन नुकताच आठवडा उलटला असला, तरीही बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ची क्रेझ कायम आहे. सगळे शो हाऊसफुल आहेत, प्रेक्षकांना सिनेमा पाहता यावा यासाठी अनेक भागांमध्ये विशेष प्रयोगांचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय मुंबई-पुण्यात काही ठिकाणी पहाटे सहाच्या आणि रात्री १२ नंतरचे शो देखील आयोजित करण्यात आले आहेत. क्लायमॅक्सला संपूर्ण थिएटरमध्ये भावनिक वातावरण निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय. एकंदर या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे ‘छावा’च्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होतेय.

१४ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी या सात दिवसांमध्ये ‘छावा’ सिनेमाने तब्बल २२५.२८ कोटींची कमाई केली आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’ला सर्वाधिक कलेक्शन करणारा सिनेमा म्हणून ‘छावा’ने रेकॉर्ड केला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड रणवीर-आलियाच्या ‘गल्ली बॉय’ सिनेमाच्या नावावर होता.

पहिल्या आठवड्यात २२५ कोटी कमावल्यावर आठव्या दिवशी या सिनेमाने २४.०३ कोटी कमावले. ‘छावा’च्या नवव्या दिवशीच्या म्हणजे दुसऱ्या शनिवारच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, या सिनेमाने नवव्या दिवशी तब्बल ४४.१० कोटींची कमाई केली आहे. दुसरा शनिवार असूनही ‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ८७ टक्क्यांची मोठी वाढ झाल्याचं वृत्त सॅकनिल्कने दिलेलं आहे. यामुळे एकूण नऊ दिवसांचं कलेक्शन २९३.४१ कोटी एवढं झालेलं आहे. रविवारी ‘छावा’ सिनेमा भारतात ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेणार आहे. या सिनेमाने नवव्या दिवशी मुंबई ( ७४ टक्के ), पुणे ( ८५.७५ टक्के ), आणि चेन्नई ( ८१.५० टक्के ) या शहरांमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे.

छावा’ सिनेमा बॉक्स ऑफिस कलेक्शन

  • पहिला आठवडा ( सात दिवस : १४ फेब्रुवारी – २१ फेब्रुवारी ) – २२५.२८ कोटी
  • आठवा दिवस – २४.०३ कोटी
  • नववा दिवस – ४४.१० कोटी
  • एकूण कलेक्शन – २९३.४१ कोटी

दरम्यान, ‘छावा’मध्ये विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, आशुतोष राणा, विनीत सिंह, दिव्या दत्ता, डायना पेंटी, प्रदीप रावत, नील भूपालम, संतोष जुवेकर असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत.

Story img Loader