Chhaava Movie CBFC Approval : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच अवघ्या चार दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला सध्या प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी, चित्रपटातील कलाकार, भव्य सेट या सगळ्या गोष्टींचं चाहते सध्या भरभरून कौतुक करत आहेत. परंतु, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना काही बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. काही आवश्यक बदलांनंतर ‘छावा’च्या अधिकृत प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
‘छावा’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर यामधले अनेक संवाद लक्षवेधी ठरले होते. यामध्ये ‘मुगल सल्तनत का जहर’ असा संवाद होता. याला बदलून, “त्या काळात अनेक राज्यकर्ते आपलं साम्राज्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत होते.” असा बदल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, ‘हे रक्त शेवटी मुघलांचंच आहे’ याऐवजी ‘हे रक्त शेवटी औरंगचं आहे’ असा बदल करण्यात आला आहे. याशिवाय काही आक्षेपार्ह शब्द म्यूट करण्यात आले आहेत.
याशिवाय, ज्या दृश्यात मराठा योद्ध्यांना साडीमध्ये दाखवण्यात आलं होतं ते दृश्य सुद्धा काढून टाकण्यात आलं असल्याची माहिती बॉलीवूड हंगामाने दिली आहे. सीबीएफच्या मागणीनुसार हे बदल करण्यात आले आहेत. याशिवाय, वयाशी संबंधित काही बदल देखील करण्यात आले आहेत. जसं की, ‘१६ वर्षे’ हे वय ‘१४ वर्षे’ असं बदलण्यात आलंय, ‘२२ वर्षांचा मुलगा’ याऐवजी ‘२४ वर्षांचा मुलगा’ असा बदल करण्यात आला आहे.
सेन्सॉर बोर्डाने निर्मात्यांना चित्रपट ज्या कादंबरीवरून घेतलाय त्याचा उल्लेख करणारा ऑडिओ-टेक्स्ट डिस्क्लेमर टाकण्यास सांगितलं आहे. यामुळे कोणाचीही बदनामी करणे किंवा ऐतिहासिक तथ्ये विकृत करणे हा हेतू नाही हे स्पष्ट होईल. सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या प्रमाणपत्रात चित्रपटाची एकूण लांबी १६१.५० मिनिटे, म्हणजेच २ तास ४१ मिनिटे ५० सेकंद इतकी नमूद केली आहे.
दरम्यान, ‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये विकी कौशलसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.