Chhaava Movie Director Laxman Utekar : संपूर्ण देशभरात सध्या ‘छावा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. विकी कौशलने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. मात्र, या चित्रपटामागे सर्वात मोठं योगदान दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचं आहे असं विकी कौशलने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. जवळपास ४ वर्षे लक्ष्मण उतेकर व त्यांची टीम ‘छावा’साठी काम करत होती. विकी कौशलसमोर सुद्धा महाराजांची भूमिका साकारण्याआधी घोडेस्वारी आणि तलवारबाजी आलीच पाहिजे अशी अट लक्ष्मण उतेकरांना ठेवली होती. आज संपूर्ण बॉलीवूडमध्ये त्यांचं कौतुक केलं जात आहे पण, प्रत्यक्षात या मराठमोळ्या दिग्दर्शकाने प्रचंड मेहनत करून हे एवढं मोठं यश मिळवलं आहे.
विकी कौशल व लक्ष्मण उतेकर यांचा एकत्र ‘छावा’ हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी या दोघांनी ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. त्याचवेळी दिग्दर्शकांनी विकीला ‘छावा’ची कल्पना दिली होती. अभिनेत्याने ‘द हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांचा प्रेरणादायी प्रवास उलगडला आहे. “लक्ष्मण उतेकरांनी इंडस्ट्रीत स्पॉटबॉय म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर ते असिस्टंट डीओपी झाले मग, डीओपी झाले त्यानंतर आज ते दिग्दर्शक आहेत” या त्यांच्या प्रवासाबद्दल विकीला प्रश्न विचारण्यात आला.
विकी कौशल यावर म्हणाला, “लक्ष्मण सरांचा प्रवास हा कोणत्याही बायोपिकपेक्षा कमी नाहीये. कारण, स्पॉटबॉय म्हणून काम करण्याआधी ते एका ऑफिसमध्ये शिपाई म्हणून नोकरी करत होते. त्याठिकाणी ते वॉशरुम, शौचालय साफ करायचे. पुढे, ते शिवाजी पार्क येथे वडापाव विकायचे. त्यांनी तिथे वडापावची गाडी सुरू केली होती आणि आज लक्ष्मण सर छावाचे दिग्दर्शक आहेत. हा प्रवास माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे.”
विकी पुढे म्हणाला, “एक माणूस म्हणून ते खरोखरंच खूप भारी आहेत. मी त्यांना माझा जवळचा मित्र, मार्गदर्शक सुद्धा मानतो. कारण, या प्रवासात मी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो. आता एक दिग्दर्शक आणि अभिनेता यापेक्षाही खूप वेगळं आमचं बॉण्डिंग झालं आहे. ही मैत्री अशीच कायम राहील. मी त्यांच्यासारखं व्यक्तिमत्व असलेल्या माणसांशी लगेच कनेक्ट होतो आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेतो.”

दरम्यान, ‘छावा’बद्दल सांगायचं झालं, तर या सिनेमाने १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर आपली वेगळी जादू निर्माण केली आहे. सिनेमाने अवघ्या दोन दिवसांत ७२ कोटींचा गल्ला जमावला आहे. आता लवकरच हा सिनेमा १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल. यामध्ये विकीसह रश्मिका मंदाना, अक्षय खन्ना, डायना पेंटी, दिव्या दत्ता, संतोष जुवेकर, आशुतोष राणा, विनीत सिंह या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.