Chhaava Movie : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाने २०२५ मध्ये आतापर्यंत सर्व रेकॉर्ड्स मोडत बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवलं आहे. या सिनेमाने सर्व प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं. यामुळेच प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. इतकंच नव्हे तर, अनेक ठिकाणी ‘छावा’चे पहाटे सहाचे शो देखील आयोजित करण्यात आले होते.
‘छावा’चं हिंदी व्हर्जन हिट झाल्यावर हा सिनेमा तामिळ भाषेतही प्रदर्शित करण्यात आला होता. सिनेमाने केवळ भारतात ६०० कोटींहून अधिक गल्ला जमावला आहे. पण, असं जरी असलं तरी काही कलाकारांना ‘छावा’ पाहिल्यावर यामधल्या काही गोष्टी खटकल्याचं पाहायला मिळालं होतं. याशिवाय शिर्केंच्या वंशजांनी देखील सिनेमावर आक्षेप घेतला होता. यावर त्यावेळी दिग्दर्शकांनी आपली बाजू स्पष्ट करत वादावर पडदा टाकला होता. पण, आता आणखी एका मराठी अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्ट्स चर्चेत आल्या आहेत. विशेष म्हणजे या अभिनेत्याने स्वत: सिनेमात काम केलेलं आहे.
अभिनेता आस्ताद काळेने ‘छावा’ सिनेमात सूर्या ही भूमिका साकारली आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यावर जवळपास २ महिन्यांनी आस्तादने फेसबुक पोस्ट शेअर करत या सिनेमातील खटकलेले मुद्दे उपस्थित केले आहेत.
अभिनेत्याने एकूण ५ पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये आस्ताद लिहितो, “हा कुठला इतिहास आहे? महाराणी सोयराबाई सरकारांनी छत्रपती संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाच्या मुलाला पत्र पाठवलं होतं? काय पुरावे आहेत याचे? मी आता खरं बोलणार आहे…छावा वाईट फिल्म आहे, फिल्म म्हणून वाईट आहे. इतिहास म्हणून बघायला गेलात तरी प्रॉब्लेमॅटिक आहे. सर्वतोपरी वाईट आहे.”
अभिनेता पुढे लिहितो, “औरंगजेबाचं वय आणि आजारपण बघता, तो या वेगाने चालू शकेल? सोयराबाई राणी सरकारांचे अंत्यसंस्कार एका नदीकाठी? असं नाही व्हायचं हो! सोयराबाई राणी सरकार या परपुरुषासमोर बसून पान लावतायत? आणि ते खातायत? हे कसं चालतं?” असे मुद्दे या पोस्टद्वारे आस्तादने उपस्थित केले आहेत.


दरम्यान, आस्तादच्या या पोस्ट्सवर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. “एवढ्या गोष्टी खटकल्या तर तू काम नव्हतं करायचं…हे तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं” अशा आशयाच्या अनेक कमेंट्स अभिनेत्याच्या पोस्टवर आल्या आहेत.