Chhaava Movie Music Launch Ceremony : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा चालू आहे. या सिनेमात अभिनेता विकी कौशल प्रमुख भूमिका साकारत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. सध्या चित्रपटाच्या बरोबरीने या सिनेमातील गाण्यांची देखील चर्चा होताना दिसत आहे. ‘आया रे तूफान’, ‘जानें तू’ ही दोन्ही गाणी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत.

‘छावा’च्या प्रदर्शनाआधी खास म्युझिक लॉन्च सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला ए आर रेहमान आणि वैशाली सामंत यांनी लाइव्ह सादरीकरण केलं. या सोहळ्याला सिनेमातील अनेक मराठी कलाकार सुद्धा उपस्थित होते. रायाजीची भूमिका साकारणारा अभिनेता संतोष जुवेकरने या सोहळ्याबद्दल भावुक करणारी पोस्ट लिहिली आहे.

संतोष लिहितो, “काल ‘छावा’ सिनेमाचा भव्य म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला… कमाल…! माझ्यासाठी डोळ्याचं पारणं फेडणारा सोहळा झाला. कारणही तसंच होतं… आजच्या काळातील संगीत जगतातला बादशहा ज्याला म्हटलं जातं… तो सम्राट ए आर रेहमान यांना याची देही याची डोळा अगदी पहिल्या रांगेत बसून पाहण्याची आणि कानभरून ऐकण्याची संधी मिळाली. मग कार्यक्रम झाल्यावर संपूर्ण टीमला रंगमंचावर बोलवण्यात आलं आणि त्यात चक्क माझं नाव पुकारलं. आधी विश्वासच बसत नव्हता मग, महेश दादाने पाठीवर जोरात थाप मारत मला उठवलं म्हणाले, “अरे जा उठ तुला बोलावलंय” काय घडतंय काही कळत नव्हतं… रंगमंचावर गेलो रेहमान सरांशिवाय काही दिसतच नव्हतं. सरळ त्यांच्या जवळ गेलो त्यांच लक्ष नव्हतं तेव्हा आमच्या विकी भाऊंनी ते ओळखलं आणि त्यांनी मला जवळ घेऊन रेहमान सरांना हाताला धरून वळवून माझी ओळख (तशी त्यांच्या समोर फुटकळचं आहे) करून दिली.”

“विकी भाऊ आय लव्ह यू… मी रेहमान सरांच्या चरणांना स्पर्श केलाय आणि त्यांनी माझा हात हातात घेऊन मला शुभेच्छा दिल्या आहेत. आईईईईई गं!!! सगळ्या कष्टाचं फळ एकदम देवानं पदरात एकाच फटक्यात घालावं आणि तेही असं भरभरून… माझ्यासाठी ‘छावा’ सिनेमा आणि रेहमान सरांबरोबर एका मंचावर, एका फ्रेममध्ये येणं हे केवळ आणि केवळ माझ्या आई-बाबांचे, देवाचे आणि माझ्या राजांचे आशीर्वाद. तसेच या जोडीला आजवरचं तुम्हा मायबाप प्रेक्षकांचं प्रेम! लक्ष्मण उतेकर सर तुम्हाला खूप खूप प्रेम आणि आदर तुम्ही मला या सिनेमाचा मला भाग बनवून घेतलंत. मॅडॉक फिल्म्सचे आणि संपूर्ण टीमचे खूप खूप आभार…; ‘छावा’ १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय नक्की पाहा.” अशी पोस्ट शेअर करत संतोषने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, ‘छावा’मध्ये विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांच्यासह अक्षय खन्ना, आशुतोष राणा, दिव्या दत्ता, डायना पेन्टी, संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत.

Story img Loader