Chhaava Movie Marathi Actors : मराठी इंडस्ट्रीपासून ते बॉलीवूडपर्यंत सध्या सर्वत्र लक्ष्मण उतेकरांच्या ‘छावा’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. या सिनेमातलं ‘जाने तू’ हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याला प्रेक्षकांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता सिनेमातल्या ‘आया रे तुफान’ गाण्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
‘छावा’ सिनेमाची संगीत दिग्दर्शक म्हणून ए आर रेहमान यांनी जबाबदारी सांभाळली आहे. ‘आया रे तुफान’ हे नवीन गाणं त्यांच्या व मराठमोळी गायिका वैशाली सामंतच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आलं आहे. या गाण्यात राज्याभिषेक सोहळ्यादरम्यानचा भावुक क्षण, मुघलांशी संघर्ष, शेवटी सिंहाचा जबडा फाडताना क्षण असे सगळे सीन्स लक्ष वेधून घेतात. पण, या संपूर्ण गाण्यात आणखी एक गोष्ट खास आहे ती म्हणजे, या गाण्यात सिनेमात काम करणाऱ्या बऱ्याच मराठी कलाकारांची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.
‘छावा’ सिनेमात अनेक मराठी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. अभिनेता संतोष जुवेकर या सिनेमात रायाजी ही भूमिका साकारणार आहे. राज्याभिषेक सोहळ्यादरम्यान रायाजी भावुक झाल्याचं ‘तुफान’ गाण्यात पाहायला मिळत आहे. तर, सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये हे दोघेही महाराजांच्या दरबारात एकमेकांच्या बरोबर बाजूला उभे आहेत. आशिष पाथोडे प्रेक्षकांना बरोबर महाराजांच्या मागोमाग चालताना दृष्टीस पडतो. तर, यापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘जाने तू’ गाण्यात प्रेक्षकांना शुभंकर एकबोटे आणि ज्येष्ठ अभिनेत्री नीलकांती पाटेकर यांची झलक पाहायला मिळाली होती.
ज्येष्ठ मराठी अभिनेत किरण करमरकर यांची देखील पुसट झलक आपल्या विकीच्या मागे चालताना ‘तुफान’ गाण्यातच पाहायला मिळते. याशिवाय सिनेमात मनोज कोल्हटकर आणि आस्ताद काळे सुद्धा आहेत. मात्र, त्यांचा लूक अद्याप समोर आलेला नाही.
दरम्यान, बहुप्रतीक्षित ‘छावा’ सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशल साकारेल. तर, महाराणी येसूबाईंची भूमिका रश्मिका मंदाना साकारणार आहे. औरंगजेबाच्या भूमिकेत अभिनेता अक्षय खन्ना झळकणार आहे. याशिवाय आशुतोष राणा, दिव्या दत्ता, विनीत कुमार सिंह, डायना पेन्टी हे कलाकार सुद्धा ‘छावा’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत.