Chhaava Movie : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा या चित्रपटाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडण्यात आली आहे. गेली चार वर्षे लक्ष्मण उतेकरांच्या संपूर्ण टीमने या चित्रपटावर मेहनत घेतली होती. २०२१ मध्येच त्यांनी विकी कौशलचं महाराजांच्या भूमिकेसाठी कास्टिंग केलं होतं. या सगळ्या मेहनतीची पोचपावती दिग्दर्शकांना सिनेमा प्रदर्शित झाल्यावर मिळालेली आहे.

‘छावा’ सिनेमा केवळ महाराष्ट्रातीलच नाहीतर देशभरातील सिनेप्रेमींच्या पसंतीस उतरला आहे. सिनेमाचा क्लायमॅक्स पाहून प्रेक्षक भावुक झाल्याचे अनेक व्हिडीओ गेले काही दिवस सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेक ठिकाणी ‘छावा’चे शो हाऊसफुल सुरू आहेत. सगळ्या प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता यावा, तरुण पिढीला महाराजांचा इतिहास कळावा यासाठी काही भागांमध्ये विशेष शोचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. ‘छावा’ने अवघ्या १२ दिवसांत बॉक्स ऑफिसवर ३७२ कोटींची कमाई केली आहे.

सध्या ‘छावा’ सिनेमाची चर्चा पाहता दाक्षिणात्य सिनेप्रेमींनी हा चित्रपट विविध भाषांमध्ये प्रदर्शित केला जावा अशी मागणी केली होती. अखेर निर्मात्यांनी याबाबत अधिकृत पोस्ट शेअर करत ‘छावा’ सिनेमा लवकरच तेलुगू भाषेत प्रदर्शित करण्यात येईल असं जाहीर केलं आहे.

“भारताच्या धाडसी महापुरुषाची कथा ‘छावा’ चित्रपटाच्या माध्यमातून आता तेलुगू प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. येत्या ७ मार्चला हा सिनेमा तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. गीता आर्ट्स डिस्ट्रिब्युशन्सच्या माध्यातून ‘छावा’ तेलुगू भाषेत प्रदर्शित केला जाईल.” अशी पोस्ट ‘मॅडडॉक फिल्म्स’कडून शेअर करण्यात आली आहे.

दरम्यान, निर्मात्यांसह विकीने ही पोस्ट शेअर करत सिनेमा लवकरच तेलुगू भाषेत प्रदर्शित होईल असं जाहीर केलं आहे. तेलुगू भाषिक प्रेक्षकांनी त्यांचे आभार मानले आहेत. तर, आता लवकरात लवकर हा सिनेमा मराठी भाषेत सुद्धा प्रदर्शित करा अशी मागणी मराठी प्रेक्षकांकडून करण्यात येत आहे. “मराठीमध्ये केव्हा होणार?”, “कन्नड आणि तामिळ भाषेत सुद्धा प्रदर्शित करा”, “मराठीत सिनेमा कधी येतोय याची वाट पाहतोय राजे” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या पोस्टवर केल्या आहेत.

Story img Loader