Vicky Kaushal Rashmika Mandanna Chhaava Movie Review : शालेय तसेच महाविद्यालयीन जीवनात आपल्यापैकी अनेकांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा अभ्यास केलेला असतो. शिवप्रेमींना तसेच ‘छावा’ कादंबरी वाचलेल्या प्रेक्षकांना चित्रपटात पुढे काय घडणार याची कल्पना आधीपासूनच असते. त्यातही बहुतांश प्रेक्षक जेव्हा एखाद्या कथानकाशी भावनिकदृष्ट्या जोडले जातात, तेव्हा या प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट दाखवताना कसं खिळवून ठेवायचं याची सर्वात मोठी जबाबदारी दिग्दर्शकाच्या खांद्यावर असते आता दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी हीच जबाबदारी कशी सांभाळलीये पाहुयात…
चित्रपटाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाच्या बातमीने होते. महाराजांनंतर दख्खनचं हिंदवी स्वराज्य आता कोलमडलेलं असेल, या औरंगजेबाच्या समजाला थेट छेद जातो, जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटल्याची बातमी तो ऐकतो आणि ती बातमी ऐकून उध्वस्तही होतो. जोपर्यंत शंभूराजेंना कैद होत नाही तोपर्यंत डोक्यावर ‘ताज’ परिधान करणार नाही असा प्रण घेत औरंगजेब मुकूट बाजूला काढून ठेवतो आणि स्वराज्याच्या दिशेने संपूर्ण फौज घेऊन चालून येतो.
स्वराज्यात आल्यावर पुढची ९ वर्षे महाराज औरंगजेबाच्या सैन्याला सळो की पळो करुन सोडतात…या सगळ्या घटना चित्रपटात अगदी व्यवस्थित आणि इतिहासाबद्दल काहीच माहिती नसणाऱ्या प्रेक्षकांनाही अगदी सहज समजतील अशा मांडण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, महाराजांच्या शोधात दिल्लीहून महाराष्ट्राकडे निघालेला औरंगजेब, दख्खनमध्ये आल्यावर महाराजांच्या शोधात बेहाल झालेला औरंगजेब… शेवटी महाराजांना कैद केल्यावर भलताच आनंदी झालेला औरंगजेब… हे औरंगजेबाच्या भूमिकेचे विविध पैलू अक्षय खन्ना याने अगदी उत्तम साकारले आहेत. राग, चीड, द्वेष, हेवा वाटणे असे सगळे भाव अक्षयच्या डोळ्यात अगदी स्पष्टपणे दिसून येतात. त्याला सिनेमात फारसे संवाद नाहीत पण, केवळ डोळ्यांनीच त्याने पडद्यावर कोणालाही क्रूर वाटेल असा औरंगजेब साकारला आहे.
बुऱ्हाणपूरवर जेव्हा मराठे आक्रमण करतात तेव्हा ‘छावा’च्या रुपात विकी कौशलची पहिली झलक सर्वांना पाहायला मिळते. याच ठिकाणी महाराज थेट सिंहाशी दोन हात करत त्याचा जबडा फाडतात, असा जबरदस्त सीन आहे. संपूर्ण चित्रपट पाहताना विकी कौशल कुठेही खटकत नाही. ही भूमिका केवळ त्याच्यासाठीच राखून ठेवलेली होती, अशी भावना प्रेक्षक म्हणून मनात निर्माण होते. अगदी विकी कौशलला सुद्धा तो पडद्यावर कोणाची भूमिका साकारणार आहे, याची पुरेपूर जाणीव होती. त्यामुळे अभिनेत्याने कोणालाही कुठेच बोट ठेवायला जागा दिलेली नाही.
![Chhaava Movie Review](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/image_bc009c.png)
मात्र, असं रश्मिकाच्या बाबतीत घडत नाही. महाराणी येसूबाईंची भूमिका तिने जशी दिग्दर्शकाच्या नजरेतून पाहिली, ऐकलीये तशीच साकारलीये…यासाठी वेगळी मेहनत घेतल्याचं जाणवत नाही. अनेकदा तिच्या तोंडून संवाद ऐकताना नकळत दाक्षिणात्य अॅक्सेंट ऐकतोय की, काय असा भास होतो. रश्मिकाची भूमिका अतिशय व्यापक होती, त्यामुळे तिच्या जागी महाराणी येसूबाईंच्या भूमिकेला योग्य न्याय देणारी अभिनेत्री नक्कीच अपेक्षित होती. रश्मिकाचे डोळे या भूमिकेसाठी निश्चितच प्रभावी वाटतात पण, संवादातून मात्र ती ऊर्जा आणि स्वराज्याच्या राणीसरकार म्हणून दिसायला हवा होता तो करारीपणा जाणवत नाही.
‘छावा’ची सगळ्यात जमेची बाजू आहे ती म्हणजे याचं संगीत. ‘आया रे तूफान’ आणि ‘जानें तू’ ही दोन्ही गाणी ए. आर. रेहमान यांनी अतिशय उत्कृष्टपणे संगीतबद्ध केलेली आहेत यात काहीच शंका नाही. पण, चित्रपटात शंभूराजे व येसूबाई राणीसरकार यांच्यातील संवाद असो किंवा महाराजांचे लढतानाचे वैयक्तिक सीन याठिकाणी मराठमोळा साज असलेलं बॅकग्राऊंड म्युझिक ( BGM ) अपेक्षित होतं. जे कानांना प्रसन्न करेल आणि त्यामुळे मराठ्यांचा उर अभिमानाने भरून येईल. अनेक दृश्यांमध्ये ते बीजीएम काहीसं मिसिंग वाटतं. याउलट औरंगजेबाच्या प्रत्येक एन्ट्रीला अगदी मुघलशासकाला साजेसं असं BGM वापरण्यात आलं आहे.
‘छावा’मधले सहकलाकार…
लक्ष्मण उतेकरांनी शंभूराजे, महाराणी येसूबाई आणि औरंगजेब यांच्यासह इतर स्टारकास्टवर सुद्धा मोठी मेहनत घेतलेली दिसते. यामध्ये विनीत सिंहला कवी कलशच्या रुपात पाहणं ही सर्वात मोठी पर्वणी ठरते. त्याने कलश यांची भूमिका साकारताना कोणतीही कमी ठेवलेली नाही. शंभूराजे आणि कवी कलश यांची क्लायमॅक्सची जुगलबंदी डोळ्यात पाणी आणते. विनीत सिंहने त्याची भूमिका अगदी चोख निभावली आहे. विनीतने साकारलेल्या भूमिकेचं सर्वात मोठं श्रेय हे संवाद लेखकांचं आहे. इरशाद कामिल आणि ऋषि विरमानी यांनी प्रत्येक संवाद अतिशय विचारपूर्वक लिहिलाय, यामुळेच शेवटची जुगलबंदी पाहताना डोळ्यात नकळत पाणी तरळतं.
याशिवाय संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, आशिष पाथोडे यांनीही त्यांच्या भूमिका चांगल्या वठवल्या आहेत. संतोष साकारत असलेल्या रायाजीच्या भूमिकेचा शेवटचा क्षण प्रेक्षकांना नि:शब्द करून टाकतो. तसेच सुव्रत जोशी आणि सारंग साठ्ये साकारत असलेल्या भूमिका नेमक्या काय आहेत हाच चित्रपटाचा सर्वात मोठा सस्पेन्स आहे. चित्रपटात प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवण्याची जबाबदारी लक्ष्मण उतेकरांनी अगदी लीलया सांभाळली आहे.
![Chhaava Movie](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/image_88aaac.png)
मोठा ट्विस्ट…
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सिनेमात कोणीही साकारत नाहीये. याजागी बॅकग्राऊंड व्हॉइस ओव्हर देऊन महाराज शंभूराजेंना वेळोवेळी कसे मार्गदर्शन करतात हे पाहायला मिळतं. ‘छावा’चा पहिला भाग काहीसा संथगतीने जातो. तर, दुसऱ्या भागात म्हणजेच मध्यातरानंतर वेगाने हालचाली होतात. शेवटचा अर्धा तास प्रत्येकाला नि:शब्द करून टाकतो. ‘छावा’ कादंबरीत जसा आहे अगदी तसाच क्लायमॅक्स प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळतो… महाराजांना औरंगजेबाने दिलेला शारीरिक त्रास, तरीही शेवटपर्यंत धर्मासाठी आणि हिंदवी स्वराज्यासाठी लढलेले महाराज या गोष्टी दिग्दर्शकाने अतिशय भावनिकदृष्ट्या मांडल्या आहेत. कुठेही काहीच खटकत नाही… फक्त तो छळ पाहताना अंगावर शहारा अन् डोळ्यात पाणी जरूर येईल. महाराजांचे शेवटचे क्षण आणि येसूबाईंनी तेवढ्याच खंबीरपणे घेतलेले निर्णय याची जोडणी क्लायमॅक्सला अगदी उत्तमप्रकारे केलेली दिसते. शेवटी शंभूराजेंचा एवढा छळ करून औरंजेबाच्या हाती येते ती फक्त हतबलता!
देश धरम पर मिटने वाला, शेर शिवा का छावा था…
महापराक्रमी परमप्रतापी, एक ही शंभु राजा था!
शेवटी… या ओळी पडद्यावर दिसतात आणि सिनेमाचा शेवट होतो. हा अभूतपूर्व अनुभव घेण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने व इतिहासप्रेमींनी ‘छावा’ सिनेमागृहांमध्ये जाऊन पाहावा असाच आहे.